वावरमध्ये वर्षभरात १२ बालकांचा कुपोषणाने मृृृत्यू
By admin | Published: June 13, 2015 10:52 PM2015-06-13T22:52:36+5:302015-06-13T22:52:36+5:30
१९९२-९३ मध्ये जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या एकाच ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेकडो कुपोषित बालकांच्या मृत्युकांडामुळे राज्यच नव्हे तर, संपूर्ण देश हादरला होता.
हुसेन मेमन, जव्हार
१९९२-९३ मध्ये जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या एकाच ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेकडो कुपोषित बालकांच्या मृत्युकांडामुळे राज्यच नव्हे तर, संपूर्ण देश हादरला होता. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी या घटेनची गंभीर दखल घेऊन २३ वर्षापूर्वी कुपोषणाच्या निर्मूलनासाठी शासन पातळीवर नियोजनबद्ध योजना आखली. केंद्र शासन तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी देखील जव्हार-मोखाडा येथे आवश्यक ती मदत केली. परंतु गेल्या वर्षभरात या एकाच ग्रामपंचायतीत १९ बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी १२ बालके कुपोषणामुळे दगावल्याने कुपोषित बालकांच्या मृत्यूचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय व आरोग्य विभागात समन्वय नसल्यानेच यात वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
कुपोषण निर्मूलनासाठी गरोदर माता सुदृढ हवी. तिला पोषक आहार मिळणे गरजेचे आहे. परंतु या भागातील जनतेला कुटंूबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत व्हावे लागते, मिळेल ते काम, काबाडकष्ट, निवाऱ्याची सोय नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशावेळी पोषक आहारच काय,मिळेल ते अन्न खावून दिवस काढावे लागतात.
शासनाकडून गरोदर माता व स्तनदा मातांना अंडी, केळी, दुध, सफरचंद हे पौष्टीक खाद्य पुरवठा केवळ कागदोपत्रीच आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे जव्हार तालुक्यात कुपोषण निर्मूलनाचा पुरता बोजवारा उडाला असल्याने कुपोषणाचा दर वाढत आहे. कागदोपत्री आकडेवारी पेक्षा अधिक पटीने कुपोषित बालके आहेत. अतिशय दुर्गम भागातील आदिवासी जनता कुपोषित बालकांना अंगणवाड्यापर्यंत पोहचवतच नाहीत. तालुक्यातील मोठ्या संख्येने जनता रोजगारासाठी स्थलांतरीत होत असल्यामुळे त्यांची नोंद शासन दरबारी होत नाही.
गेल्या वर्षभरात बालविकास कार्यालयात त्या ग्रामपंचायतीमध्ये कुपोषणामुळे १२ बालकांचा मृत्यू झाल्याची जरी नोंद असली तरी, अन्य ७ बालकांचा मृत्यू हा त्या बालकांचे वजन कमी असल्यामुळे झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघातील हा तालुका आहे. स्वत:च्या मतदारसंघात आदिवासी बालकांना कुपोषणामुळे आपले प्राण गमवावे लागतात. आदिवासींच्या विकासासाठी त्यांना मंत्री केले मात्र स्वत:च्या मतदारसंघाकडे वेळ देत नसेल तर आदिवासी जनतेने कुणाकडे दाद मागायची.
- यशवंत बुधर, उपसरपंच, वावर-वांगणी ग्रामपंचायत