पालघर : डहाणू तालुक्यात टेलरींगच्या व्यवसाय करणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या योगेश उत्तम दुबळा या आरोपीस पालघर न्यायालयाचे सत्र न्यायाधिश एम. एस. क्षीरसागर यांनी चार वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रू. दंडाची शिक्षा सुनावली.डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणीचे शेजारी राहणाऱ्या मोहित सोलंकी याने त्याचा मित्र योगेश दुबळा यांच्याशी मार्च २०११ साली होळीच्या सणानिमित्त ओळख करून दिली. तीचे गाढ मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर आरोपीने तीला मोबाईलवरून फोन करून आशागडच्या संतोषीमाता मंदिरात आपल्या मोटरसायकलवर बसून नेले. नंतर तिला आपल्या सावटा येथील फार्महाऊसमध्ये नेऊन आपण खूप श्रीमंत असल्याचे दर्शविले. जुलै २०११ साली त्याने या तरूणीला मोबाईलद्वारे फोन करून आपल्या फार्महाऊसवर बोलावले व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. याच दरम्यान बाहेर गेलेले आरोपीचे वडील अचानक फार्म हाऊसवर आल्याने दोघांचेही प्रेमप्रकरण बाहेर आले. यावेळी आरोपीच्या वडीलांनी सदर मुलीची चौकशी करून त्यांच्या प्रेमाला विरोध दर्शविला. परंतु आरोपीने आपल्या निस्सीम प्रेमाची ग्वाही देत तिच्याशी अनेक वर्षे शारीरीक संंबंध प्रस्थापित केले. याच दरम्यान आरोपी त्या मुलीला हळुहळू टाळू लागल्याने व दमण येथील तरूणीशी त्याने लग्न ठरविल्याचे कळल्यानंतर आरोपी योगेश दुबळा याच्या विरोधात ३१ डिसेंबर २०१२ रोजी कासा पो. स्टे. सहा. पो. नि. अनिल पाटील यांनी भादवी ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पालघरच्या न्यायालयाने सत्र न्यायधिश एम. एम. क्षीरसागर यांच्यासमोर या प्रकरणासंदर्भात दावे प्रतिदावे होऊन सरकारी वकील अॅड. परवेझ पठाण यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह सात भक्कम साक्षीदारांची बाजू मांडल्यानंतर सत्र न्यायधिशांनी या प्रकरणी आरोपी मोहित सोलंकी यास चार वर्षे सक्तमजुरी व दहा हजाराचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. यामध्ये दंडातील ५ हजार रू. ची रक्कम फिर्यादीमुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. पठाण यांनी दिली. (वार्ताहर)