मुंबई : घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली आणि या सेवेमुळे लोकल प्रवाशांचा प्रवासही सुकर झाला. मेट्रोमुळे पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी एका डब्यातील प्रवासी संख्या २१ टक्क्यांनी कमी झाल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आणि ही मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीसही उतरली. सुरुवातीला महिनाभरासाठी दहा रुपये आकारणी करण्यात आल्याने त्याचा आर्थिक फायदा मेट्रोला झाला आणि त्यांची प्रवासी संख्याही वाढली. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढत गेला आणि आता तब्बल पाच कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्याचे मेट्रो प्रशासन सांगते. मेट्रो सुरू होताच प्रवाशांचा लोकलवर मोठ्या प्रमाणात पडणारा ताण कमी झाला. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात उतरून मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील स्थानक गाठावे लागत असल्याने एकच गर्दी होत होती. मात्र आता मेट्रोमुळे दादर स्थानकापर्यंत प्रवासी न जाता अंधेरी स्थानकात उतरून मेट्रोने घाटकोपरपर्यंत प्रवास करतात आणि डाऊनला ट्रेन पकडतात. त्याचप्रमाणे काही प्रवासी हे सीएसटीकडे जाण्यासाठीही हाच पर्याय निवडतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या एका डब्यातील प्रवासी संख्या कमी झाली असून, प्रवाशांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)८९ टक्के महिला प्रवाशांची मेट्रोला पसंतीमेट्रोतून दर दिवशी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. अशा मेट्रोला महिला प्रवाशांनी जास्त पसंती दिल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मेट्रोकडून नुकतेच एक सर्वेक्षणही करण्यात आले असून यात ८९ टक्के महिला प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. त्याचप्रमाणे ८४ टक्के पुरुषांची मेट्रो प्रवासाला पसंती आहे. मुंबई मेट्रो स्वच्छतेत आघाडीवरमुंबई मेट्रो स्वच्छतेबाबतीत आघाडीवर आहे. केडेसं इंटरनॅशनल सर्व्हे कंपनीकडून केलेल्या सर्व्हेत ९१ टक्के लोकांनी मेट्रो स्वच्छतेत आघाडीवर असल्याचे सांगितले आहे. तर मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये ९0 टक्के लोकांनी आणि बेस्टमध्ये १७ टक्के लोकांनी स्वच्छता असल्याचे सांगितले. हा सर्व्हे करताना १00३ लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये ५0६ पुरुष आणि ४९७ महिलांचा समावेश होता. त्याचप्रमाणे मुंबईतील लोकलमध्ये ९ टक्के, गार्डनमध्ये ९ टक्के आणि रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेस पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे. लोकलमधील डब्यात अनधिकृतपणे पोस्टर्स लावून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करूनही पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होते. मात्र मेट्रो प्रशासनाकडून अशा पोस्टर्सबाजीवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकांच्या खांबांवर तब्बल १,२00 पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे पोस्टर्स ज्यांच्याकडून चिकटवण्यात आले त्यांना याची माहिती देऊन बोलावण्यात आले आणि पोस्टर्स काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचप्रमाणे केमिकल वापरून खांब स्वच्छ करण्यात आले. पोस्टर्स चिकटवण्यात आलेल्या संबंधित कंपन्यांना मेट्रोकडून नोटीस बजावण्यात आल्या. अशा ७0 नोटिसा बजावण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले, तर २५ पेक्षा जास्त तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या आहेत.
मेट्रोमुळे प. रेल्वेचा प्रवास सुकर
By admin | Published: September 27, 2015 2:02 AM