मुंबई : मान्सूनपूर्व कामांची डेडलाइन संपून पंधरवडा उलटला तरी मुंबईतील नाले गाळात आहेत. यामुळे मुंबईकरांची यंदाच्या पावसाळ्यात दैना उडणार आहे. तसेच रस्तेही खड्ड्यात असल्याने मुंबईची वाट बिकट आहे. पालिका प्रशासनाची बेपरवाई या गैरसोयीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात शुक्रवारी केला.धारावी येथील नालेसफाईची पाहणी मिलिंद देवरा यांनी शुक्रवारी केली, या वेळी ते बोलत होते. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी ३१ मे ही डेडलाइन ठेवण्यात आली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही अनेक ठिकाणी नाले गाळातचं आहे.
देवरा म्हणाले, मुंबईमध्ये दरवर्षी नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने, पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मुंबईची अक्षरश: तुंबई होते. नाले साफ होत नसल्याने पावसाळ्यामध्ये ते तुडुंब भरतात. त्यातील घाण पाणी रस्त्यावर पसरते. काही ठिकाणी लोकांच्या घरातही शिरते. याच घाण पाण्यातून लोकांना प्रवास करावा लागतो. या घाण पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया आजार पसरतात.नाल्यांवर संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असते. काही ठिकाणी ती बांधली जात नाही. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यामध्ये अशा नाल्यांमध्ये एखादे वाहन नाल्यात पडून अपघात होण्याची शक्यता वाढते. धारावी विभागातील मुख्य नाल्यांची अजूनही सफाई झालेली नाही. या नाल्यावरील संरक्षण भिंत काही ठिकाणी पूर्णपणे कोसळलेली आहे. ही बाब अतिशय धोकादायक आहे. ही भिंत त्वरित बांधणे गरजेचे आहे.या प्रकरणी मी आणि येथील आमदार वर्षा गायकवाड यांनी महापालिकेशी चर्चा केली आहे. त्यांनी दोन दिवसांत येथील नाल्यांची सफाई करण्याचे, नाल्यांवरील कोसळलेली संरक्षण भिंत पुन्हा बांधून पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या पाहणीवेळी येथे माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, अमीन पटेल, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते.