Join us

नव्या नोटा न दिल्याने गोवंडीत उपचाराअभावी चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Published: November 12, 2016 6:00 AM

पाचशे आणि हजारांच्या नोटावर बंदी असल्याने नवीन नोटाचा आग्रह करत गोवंडीतील एका खासगी रुग्णालयाने तीन दिवसांच्या मुलावर उपचार करण्यास नकार दिला

मुंबई : पाचशे आणि हजारांच्या नोटावर बंदी असल्याने नवीन नोटाचा आग्रह करत गोवंडीतील एका खासगी रुग्णालयाने तीन दिवसांच्या मुलावर उपचार करण्यास नकार दिला. परिणामी राजावाडी रुग्णालयात या मुलाला दाखल करण्यापूर्वी रस्त्यामध्येच या मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर गोवंडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील रोड नंबर १ येथे राहणारे राजेश शर्मा यांची पत्नी रंजना शर्मा यांनी बुधवारी मुलाला जन्म दिला. मात्र शुक्रवारी सकाळी या मुलाची प्रकृती बिघडल्याने त्याला याच परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने तत्काळ ६ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. मुलाच्या वडीलांनी पैशांचा बंदोबस्त केला. मात्र यामध्ये साडेतीन हजार रुपयांच्या शंभरच्या तर अडीच हजारांच्या पाचशेच्या नोटा होत्या. रुग्णालयाने जुन्या पाचशेच्या नोटा घेण्यास नकार दिला. मुलाच्या नातेवाईकांनी याकरिता विनंतीही केली. मात्र तरिही रुग्णालयाने मुलाला दाखल करून घेतले नाही. परिणामी वडीलांनी मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलाला राजावाडीमध्ये नेण्यात येत असतानाच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, नागरिकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्याला घेराव घालत मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)