Join us

एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हिंदुंनाही जड जाईल-  उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 06:22 IST

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी केली याचा अर्थ आम्ही धर्म बदलला असे नाही. राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे केवळ मुस्लीम समुदायालाच नव्हे, तर हिंदुंनासुद्धा नागरिकत्व सिद्ध करणे जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसीला विरोध दर्शविला आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (एनआरसी) देशभर वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला मुरड घालावी लागत आहे, अशी टीका होत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत सीएए आणि एनआरसीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मुलाखतीचा काही भाग रविवारी सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला.

सीएएमुळे कोणाच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही. मात्र, एनआरसीमुळे नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुस्लिमांनाच नाही तर हिंदुंनासुद्धा जड जाणार आहे. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारनागरिकत्व सुधारणा विधेयकराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीमहाराष्ट्र