Join us

असंख्य अडचणींमुळे यावर्षी जूनपासून शाळारंभ अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:52 AM

पालक, विद्यार्थी काळजीत : प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार तरी कशा?

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील शाळा जूनपासून सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला असला तरी शिक्षक आमदार, शिक्षकांच्या विविध संघटनांनी त्यास तीव्र विरोध केला आहे. जुलैमध्ये परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील शिक्षक आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी सर्व आमदारांनी शाळा जूनपासून सुरू करण्यास स्पष्टपणे विरोध दर्शविला होता. मात्र रविवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारला स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी १५ जूनपासून शाळा सुरू करायच्या असतील तर त्यांनी त्या खुशाल कराव्यात. मात्र भयग्रस्त पालक, विद्यार्थी तसेच अन्य कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात आलेले शिक्षक यांच्या मानसिकतेचा विचार केला तर सरकार निश्चितपणे निर्णयावर पुन्हा विचार करेल, असे मत नागपूरचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

शाळा सुरू करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. एकेका वर्गात ५० ते ६० विद्यार्थी असतील तर सामाजिक अंतर राखणे अशक्य आहे. आज शिक्षकांना कोरोनाचा सामना करण्यासाठीची विविध कामे देण्यात आली आहेत. त्यात चेक नाक्यावर उभे राहण्यापासून सर्वेक्षणापर्यंतची कामे त्यांना करावी लागत आहेत. आणखी काही दिवस त्यांची या कामांमधून सुटका होण्याची शक्यता नाही. उद्या सुटका झाली तर त्यांना पंधरा दिवस होम क्वॉरंटाईन राहावे लागेल. म्हणजे जूनअखेरपर्यंत शिक्षक उपलब्ध होण्याची शक्यता नाही, असे औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले. आॅनलाइन शिक्षणाची कल्पना चांगली आहे मात्र ती व्यवहार्य नाही, कारण त्यामध्ये प्रचंड तांत्रिक अडचणी आहेत. फारतर १५ ते २० टक्के मुलांपर्यंत आॅनलाइन शिक्षण पोहोचू शकेल, असे मतही गाणार व काळे यांनी व्यक्त केले. शाळा जूनमध्ये सुरू करणे अजिबात योग्य नसल्याचे देखील ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने स्थापन केलेल्या अभ्यास गटाने शाळा सुरू करताना कोणती काळजी घ्यावी, यासंबंधी महत्त्वाच्या शिफारसी शासनाला केल्या आहेत.

शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनीही जूनमध्ये शाळा सुरू करणे अतिशय अयोग्य ठरेल, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, फार तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग जुलैमध्ये सुरू करावेत पण प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा जूनमध्ये अजिबात सुरू करू नयेत.आमदार, संघटनांचा जूनला प्रचंड विरोधशिक्षक आमदार व संघटनांचा जूनला प्रचंड विरोध आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील नामवंत पाच शाळांमधील पालक-शिक्षक संघाच्या पालक प्रतिनिधींशी चर्चा केली असता त्यांनीही जूनमध्ये शाळा सुरू करण्याची जोखीम शासनाने पत्करू नये, विद्यार्थ्यांचे जीव महत्त्वाचे आहेत असे मत व्यक्त केले.