Join us

ऑनलाइन दर्शनामुळे गणपती मंडपात भाविकांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 1:20 AM

गर्दी न करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. अनेक मंडळांनी आपला गणेशोत्सव रद्द केला तर काही मंडळांनी दीड दिवसाचा गणपती बसविला. ज्या मंडळांनी यंदा गणपती बसविला आहे अशा मंडळांनी सुरक्षेची सर्व खबरदारी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण, मास्क वापरणे यासोबतच यंदा सर्व गणेश मंडळांनी आपल्या भाविकांसाठी २४ तास आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था केली. यामुळे गणेशभक्तांना घरबसल्या गणपतीचे दर्शन मिळाले. गणपतीच्या आरतीसाठी प्रत्यक्ष मंडपात गर्दी न करता नागरिकांनी घरबसल्याच आरतीत सहभाग घेतला. यामुळे गर्दी टाळण्याचा उद्देश साध्य झाल्याचे चित्र सर्व गणेश मंडळांमध्ये पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात अनेक गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरे व रक्तदान शिबिरेदेखील भरविली. यंदा आगमन सोहळा, विसर्जन मिरवणूक तसेच भव्यदिव्य रोशणाई व सजावट नसल्यामुळे मंडळाच्या खर्चालादेखील आळा बसला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंडळातर्फे भाविकांना घरबसल्या गणरायाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविक घरबसल्याच बाप्पाचे दर्शन घेत होते. काही भाविक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंडपात येत आहेत. तरीदेखील हे भाविक सुरक्षेच्या दृष्टीने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गणपतीचे दर्शन घेत आहेत. दरवर्षी उत्सवातील सर्व दिवस भाविकांची अलोट गर्दी असते. मात्र यंदा मंडळाच्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला व अजिबात गर्दी केली नाही. गणेशोत्सवाच्या आधी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. मात्र उत्सवादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कोणताच उपक्रम हाती घेतला नाही. - स्वप्निल परब, सरचिटणीस, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्लीगणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी भाविक आमच्या गणपतीच्या दर्शनाला येत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. मंडपात एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखता यावे यासाठी आम्ही काही चिन्हे आखली आहेत. गणपतीच्या दर्शनाच्या वेळेस तसेच आरतीच्या वेळेस या चिन्हांवर उभे राहूनच गणपतीची पूजा केली जाते. मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना घरी बसूनच दर्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी मंडळाच्या फेसबुक पेज आणि यूट्युब चॅनेलवरून २४ तास लाइव्ह दर्शनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व नागरिक मंडळाचे आभारदेखील मानत आहेत. - आशिष सावंत, विश्वस्त, लालमैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

टॅग्स :गणेशोत्सव