सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ज्येष्ठ वकिलाविरोधातील खटल्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:03 AM2019-04-19T01:03:15+5:302019-04-19T01:03:18+5:30
महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आयकर विभागाच्या वकिलाने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला.
मुंबई : नऊ वर्षांपूर्वीच्या विधि शाखेतील विद्यार्थिनीला शिवीगाळ केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेला अहवाल फेटाळून लावण्याच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आयकर विभागाच्या वकिलाने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला.
२२ डिसेंबर २0१0 रोजी तक्रारदार युवती एका सुनावणीतील युक्तिवाद ऐकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेली असता अॅड. चरणजित चंदरपाल यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याची तिची तक्रार होती. त्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी चौकशीअंती तक्रार खोटी असल्याचे अहवालात नमूद केले होते. २ सप्टेंबर २0१४ रोजी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व्ही.डी. निंबाळकर यांनी या प्रकरणात अधिक चौकशी आवश्यक असल्याने म्हणत पहिला तपास अहवाल फेटाळून लावला
होता.
महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दुसऱ्या वेळीही तपास अहवाल तक्रार चुकीची असल्याचा शेरा मारून सादर केला. त्यामुळे तक्रारदार युवतीने महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज करीत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. आरोपी प्रभावशाली असल्याने आपली तक्रार खोटी असल्याचे पोलीस म्हणत असल्याचे तिने त्यात नमूद केले.
दरम्यान, आरोपीने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयाने ११ मार्च २0१५ रोजी याचिका निकाली काढली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने १३ नोव्हेंबर २0१८ रोजी अॅड. चंदरपाल याची याचिका फेटाळून लावली आणि चौकशी अहवाल आणि तक्रारदार युवतीचा अर्ज याबाबत सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाला दिले.
२१ डिसेंबर २0१८ रोजी एक्स्प्लनेड कोर्टातील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आय. आर. शेख यांनी बी समरी अहवाल फेटाळून लावल्याच्या विरोधात आरोपी चंदरपाल याने ५ मार्च २0१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल केला होता. मात्र १२ एप्रिल रोजी न्यायालयाने तो फेटाळून लावला.
एक्स्प्लनेड कोर्टातील ६४ व्या न्यायालयातील महानगर दंडाधिकारी एन. एन. जोशी यांनी सुनावणीसाठी ७ मे ही तारीख दिली आहे. आरोपी चंदरपाल याने २0१८ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूकही लढवली होती.