मुंबई : वाहनतळ धोरणावरून भाजपांतर्गतच जुंपली आहे. या धोरणाच्या प्रयोगांचे कुलाब्यातील भाजपा नगरसेवकांकडून स्वागत होत असताना भाजपाचे स्थानिक आमदार राज पुरोहित यांनी या प्रस्तावावर स्थगिती आणण्याचा इशारा दिला आहे. पार्किंगसाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणी करतानाच या धोरणाचा प्रयोग कुलाब्यात कशाला? मुलुंड आणि बोरीवलीत करा, असे आव्हान पालिकेला देत स्वपक्षीय आमदारांना त्यांनी अप्रत्यक्ष डिवचले आहे.दोन वर्षांच्या विलंबानंतर अंमलात येणाऱ्या वाहनतळ धोरणाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत, हेच यामुळे समोर आले आहे. पार्किंगसाठी आकारण्यात येणारे दर आणि इमारतीबाहेर पार्किंगला कुलाब्यातून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे हे धोरण पुन्हा अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे या धोरणावरून भाजपामध्येच दोन गट पडले आहेत. भाजपा नगरसेवक मकरंद नार्वेकर व आमदार पुरोहित यांच्या नेतृत्वाखालील दोन वेगवेगळे गट नुकतेच ए विभागाच्या सहायक आयुक्तांना प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात भेटून आले. भाजपातीलच या दोन वेगळ्या भूमिकांनी राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात गेल्या महिन्यात पार्किंग धोरण ए वॉर्डात अंमलात आल्याने कुलाब्यातून त्यास नागरिक विरोध करत आहेत. त्यामुळे पार्किंगचे दर कमी करा, ही मागणी आमदार पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यातील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)ए विभागातील कुलाबा, फोर्ट या भागात या धोरणाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू आहे. ए विभागात १८ वाहनतळांवर सध्या पार्किंग सुरू करण्यात आले आहे. इमारतींखालील रस्त्यांवर पार्क केल्या जाणाऱ्या रहिवासी वाहनतळातील वाहनांकडून मासिक दोन हजार रुपये तर व्यावसायिक विभागात मासिक सहा हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या धोरणाला विरोध करण्यासाठी कुलाब्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली.कुलाबा असोसिएशन कमिटी, सीपीआरए कमिटी, कुलाबा स्टॅण्ड सिनेमा कमिटी, कुलाबा पोस्ट आॅफिस असोसिएशन, कुलाबा हेरिटेज असोसिएशन यासह रहिवाशांच्या २८ संस्थांचे प्रतिनिधी या वेळी हजर असल्याचा दावा पुरोहित यांनी केला.पार्किंग धोरणातील दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, रहिवासी वाहनतळात गाड्यांसाठी मासिक ५०० रुपये शुल्क आकारले जावे. पार्किंगची वेळेची अट काढून टाकावी तसेच स्थानिक वाहतूक व्यवस्थापन धोरण तयार करून त्यात संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश असावा, अशा मागण्या रहिवाशांनी आयुक्तांकडे केल्या आहेत. येथे झाली शुल्कवाढ : फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम. जी. रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नं. १, २ आणि ३, एम. जी. रोड , बद्रुद्दिन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नं. ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथिबाई ठाकरसी मार्ग
वाहनतळ धोरणावरून भाजपातच जुंपली
By admin | Published: April 21, 2017 1:08 AM