Join us

अखेरच्या डीसी लोकलला प्रवाशांचा दुष्काळ

By admin | Published: April 11, 2016 2:56 AM

डीसी ते एसी परिवर्तनावर धावणाऱ्या शेवटच्या लोकलला शनिवारी मध्य रेल्वेने अखेरचा निरोप दिला. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी मध्य रेल्वेने या शेवटच्या लोकलचे विशेष तिकीट १०

मुंबई : डीसी ते एसी परिवर्तनावर धावणाऱ्या शेवटच्या लोकलला शनिवारी मध्य रेल्वेने अखेरचा निरोप दिला. दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी मध्य रेल्वेने या शेवटच्या लोकलचे विशेष तिकीट १० हजार रुपये ठेवले होते, परंतु नियोजनाचा अभाव आणि तिकिटांची अवाच्यासवा किंमत यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठच फिरवली. तिकिटांची किंमत काही कमी होऊ शकते का, अशी विचारणा ही लोकल सुटेपर्यंत तिकीटविक्रीची जबाबदारी असलेल्या जे. जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चरकडे होत होती. डीसी परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी नऊ डब्यांच्या या लोकलमधून प्रवास करण्यासाठी दहा हजार रुपयांचे तिकीट आकारण्यात आले होते. चौकशी व विक्रीचे काम मध्य रेल्वेने जे.जे.स्कूल आॅफ आर्किटेक्चरला दिले. चौकशीसाठी व तिकीट बुक करण्यासाठी फोन नंबरही उपलब्ध करण्यात आला, परंतु त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविली.जे. जे. ने ३00 तिकिटे छापली होती. त्यासाठी त्यांना साधारण १० हजार रुपयांच्या खर्च आला होता. तिकीटविक्रीतून मिळणारे पैसे दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार होते. मात्र, नियोजन करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे आणि तिकिटाची किंमत पाहता तिकिटे विकली गेली नाहीत.जे.जे.स्कूल आॅफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी सांगितले, ‘सुमारे ५00 लोकांनी आमच्याकडे तिकिटांसंदर्भात संपर्क साधला. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिकिटांबाबत चौकशी सुरू होती. किंमत काही कमी होऊ शकते का, याची विचारणाही झाली आणि किंमत कमी होत नसल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली. मात्र, असे करता येणे शक्य नसल्याचे त्यांना स्पष्ट सांगण्यात आले. ही तिकिटे आता मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.’मुंबईतील क्रिकेट सामना आणि वरळीतील एका महोत्सवामुळे या ऐतिहासिक क्षणाकडे लोकांनी पाठ फिरविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.