Join us

धर्मादाय रुग्णालये जाणार रुग्णांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:34 AM

मुंबई : राज्यभरातील सुमारे ३५४ धर्मादाय रूग्णालये येत्या ३ डिसेंबर रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रूग्णांसाठी विशेष तपासणी मोहिम हाती घेणार आहेत.

मुंबई : राज्यभरातील सुमारे ३५४ धर्मादाय रूग्णालये येत्या ३ डिसेंबर रोजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रूग्णांसाठी विशेष तपासणी मोहिम हाती घेणार आहेत. ‘रूग्णालय आपल्या दारी’ या मोहिमे अंतर्गत आपापल्या भागातील झोपडपट्टया, दुर्गम भागातील वस्त्या आणि रस्त्याच्याकडेला, फुटपाथवरील आजारी रूग्णांची तपासणी व औषधोपचारांसाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिली.न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धर्मादाय रूग्णालयांना आर्थिकदृष्टया दुर्बल व निर्धन रूग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. त्यासाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवणे आवश्यक असताना रूग्णालयांकडून त्याचे पालन होत नाही. शिवाय, काही मोठ्या धर्मादाय रूग्णालयांचा पंचतारांकित थाट पाहून आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील रूग्ण तिकडे फिरकत नाही. याबाबत समाजात जागृती व्हावी या उद्देशाने धर्मादाय आयुक्तालयाने ‘रूग्णालय आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. यापूर्वी मुंबईतील ७६ धर्मादाय रूग्णालयांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता राज्यभर ही माहीम राबविण्यात येणार आहे.>पिवळे राशन कार्डधारक तसेच वार्षिक उत्पन्न ५० हजारापर्यंत असणा-यांवर मोफत तर एक लाखापर्यंत उत्पन्न असणा-या रूग्णांवर ५० टक्के सवलतीत उपचार करणे धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे. या सवलतीचा गरजूंनी लाभ घ्यावा. यासंदर्भात काही तक्रारी असतील तर धर्मादाय आयुक्तालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त डिगे यांनी केले आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई