Join us

सपाटीकरणामुळे रानभाज्यांची आवक थंडावली

By admin | Published: June 27, 2015 10:44 PM

उरणच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणासाठी माती, दगडांच्या भरावांची कामे सुरू आहेत. या भरावासाठी जवळची जंगले आणि डोंगर

चिरनेर : उरणच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणासाठी माती, दगडांच्या भरावांची कामे सुरू आहेत. या भरावासाठी जवळची जंगले आणि डोंगर भुईसपाट करण्याचा सपाटा लावल्याने यंदा बाजारात पावसाळी रानभाज्या पुरेशा प्रमाणात आलेल्या नाहीत. बेसुमार वृक्षतोड आणि डोंगरांचे सपाटीकरण यामुळे या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी पावसाळा सुरू झाल्यावर जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागत असत. सध्या मात्र पाऊस चांगला पडत असून देखील या भाज्यांची आवक कमी झाली आहे. पावसाळ्याची चाहूल लागली की, या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि माळरानात आढळणारे करांदे, हळदे यासारखे कंद तसेच शेवळा, टाकळा, कंटोली, कोरळा, भारंगी, फोडशी कुर्ळू, भोकर यांसारख्या रानभाज्या गोळा करून त्याची पनवेल, उरण यासारख्या मोठ्या बाजारपेठांत विक्री करून आपली उपजीविका करतात. या प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने आणि आरोग्यवर्धक असल्याने खवय्यांना देखील या रानभाज्यांचे वेध लागतात. या रानभाज्या या स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांची चांगली मागणी असते. (वार्ताहर)