मुंबई : थकलेले शरीर.. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि भूक, तहानेने व्याकूळ झालेल्या ६५ वर्षांच्या आजी मदतीसाठी अन्य ठिकाणाप्रमाणेच साकीनाका पोलिसांकडे गेल्या. एरवी कडक आणि शिस्तीचा आग्रह धरणा-या खाकी वर्दीतील माणुसकीचे अनोखे दर्शन तिला अनुभवयास मिळाले. त्या पोलीस कर्मचाºयांनी त्या आजीला आर्थिक मदत करीत तिच्या उर्वरित आयुष्यासाठी हक्काचा आसरा मिळवून दिला. लता परदेशी नावाच्या या आजीची कर्जत येथील एका वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था पोलिसांनी केली.साकीनाक्यातील एका चाळीतील खासगी हॉस्पिटलमध्ये सफाईचे काम करून लता परदेशी त्या ठिकाणी राहात होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी पालिकेने चाळीवर हातोडा फिरवला आणि या आजींना बेघर व्हावे लागले. विपन्नावस्थेत त्या बुधवारी साकीनाका पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक नीलेश भालेराव कर्तव्यावर होते.आजींची अवस्था पाहून भालेराव यांनी त्या आजींकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांची व्यथा भालेराव आणि साकीनाका पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच अधिकाºयांना समजली. त्यामुळे त्या आजींना प्रथम पोटभर जेवण देण्यात आले. मात्र निव्वळ जेवण देऊन त्या आजींची समस्या संपणार नव्हती. त्यामुळे त्यांनी कर्जतच्या एका वृद्धाश्रमाची माहिती काढत आजींची त्या ठिकाणी रवानगी करण्याचे ठरविले.याबाबत वरिष्ठ निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांना समजल्यानंतर त्यांच्या सर्व टीमने जमेल तशी रक्कम स्वत:च्या खिशातून काढत २२ हजार रुपये जमा केले. ही रक्कम घेऊ न त्या आजींसह एक महिला पोलीस कर्मचारी कर्जतला रवाना झाल्या. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी साकीनाका पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर त्याची सचित्र माहिती दिली आहे.
पोलिसांमुळे आजीला मिळाला आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:22 AM