वडाळ्यातील पोर्ट ट्रस्टच्या टाक्या झाल्या जीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 02:58 AM2018-12-03T02:58:28+5:302018-12-03T02:58:34+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निकामी जीर्ण झालेल्या हजारो टनाच्या उंच पाण्याच्या टाक्या कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे या टाक्या कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पोर्ट ट्रस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निकामी जीर्ण झालेल्या हजारो टनाच्या उंच पाण्याच्या टाक्या कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे या टाक्या कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, पोर्ट ट्रस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा पूर्वेला कामगारांना राहण्यासाठी भाडेतत्त्वावर पाच वसाहती आहेत. यामध्ये सद्भावनानगर, तेजसनगर, जुनी वसाहत आणि नवी वसाहतीचा समावेश आहेत. यामध्ये जवळपास दीडशे इमारती आहेत. या वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या पाणीपुरवठ्यासाठी १९९४ साली ७० ते ८० फुटांच्या तीन लोखंडी टाक्या बनविण्याचा निर्णय पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने घेतला. त्यानुसार, सद्भावनानगर, नवी वसाहत आणि जुनी वसाहत या ठिकाणी तीन पाण्यांच्या टाक्या बनविण्यात आल्या. त्यानुसार, सर्व इमारतींना भूमिगत जलवाहिन्याही जोडण्यात आल्या.
मात्र, पालिकेच्या पाण्याचा दाब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे या टाक्यांत पंपाद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे या टाक्यांचा वापर मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडून बंद करण्यात आला. या निकामी झालेल्या या टाक्यांकडे पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, या टाक्या जीर्ण होऊन भंगारात जमा झाल्या आहेत.
या उंच टाक्यांचे संपूर्ण लोखंडी स्ट्रक्चर गंजले आहे. टाक्यांच्या पायथ्याशी घुशींनी जमीन पोखरल्याने या तिन्ही टाक्या कमकुवत झाल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
>प्रशासन नॉट रिचेबल!
या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, याविषयी बोलण्यास नकार दिला. त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सचिवांशी याविषयी बोलण्यास सांगितले. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या कार्यालयीन सचिवांनी ते उपलब्ध नसल्याचे सांगितले.
...तर काही प्रमाणात खर्च वसूल होईल
या निकामी झालेल्या टाक्या भंगारात काढल्याने, त्यावर झालेला खर्च काही प्रमाणात वसूल होतील. या पैशांचा इतर गोष्टींसाठी उपयोग होऊ शकतो. या टाक्या बनविण्यासाठी खर्च झालेला पैसा काही रक्कम परत मिळविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे समाजसेवक बबलू पॉल यांनी सांगितले.
>टाक्यांच्या शेजारीच पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या इमारती आहेत. येथे हजारोंच्या संख्येने पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या कामगार वर्गांची कुटुंबे धोकादायक अशा परिस्थितीत राहत आहेत, तर नवी वसाहतीतील टाकी ही पालिका शाळेच्या शेजारीच लागून आहे. हीसुद्धा टाकी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. जुन्या वसाहतीतील असलेल्या टाकीच्या चाळीस फूट अंतरावरच कोरबा मिठागर या परिसरातील मोठी झोपडपट्टी आहे. ही जीर्ण टाकी हेलकावे घेत असल्याचे झोपडपट्टीवासीयांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाला लेखी तक्रार देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असे समाजसेवक भगवान कदम यांनी सांगितले.