मुंबई: गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे आरेतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने, या मार्गे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जमाती विभागाकडून देण्यात आला आहे. गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या, आरे कॉलनीतील दिनकरराव देसाई या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. ज्यात पावसाने आणखी भर पाडत, रस्त्याची चाळण केली आहे. दिनकरराव देसाई मार्गावरील छोटा काश्मीर, युनिट नंबर २, पिकनिक पॉइंट ते मरोळ चेकनाका या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अरुंद असलेल्या या मार्गावर खड्डे पडल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे, ज्याचा त्रास विद्यार्थी, वाहनचालक, तसेच स्थानिकांना सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना रोज शाळेत पोहोचण्यास आणि घरी येण्यास उशीर होत आहे. अनुसूचित जमाती विभागाचे विभाग अध्यक्ष सुनील कुमरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, दिनकरराव देसाई मार्ग हा जवळपास ७.२ किलोमीटरचा आहे. या मार्गातील रस्त्यावर विजेचे पोल बसविण्यात आले आहेत. मात्र, गोरेगाव चेकनाका ते युनिट नंबर ३२ या रस्त्यावरील दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंतच विजेच्या पोलवरील दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, तिथून पुढच्या रस्त्यावर विजेचे पोलच नाहीत. त्यामुळे एकतर खड्डे आणि त्यात अंधारामुळे येथील राहिवाशांसह वाहनचालकाना अंधारातूनच प्रवास करावा लागतो. ‘या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आम्हाला पालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे तसे न झाल्यास, आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत,’ असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर तरी आरे खड्डेमुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
खड्ड्यांमुळे आरेतील रहिवासी त्रस्त
By admin | Published: September 28, 2016 2:35 AM