सुविधांची गाडी रुळावरून घसरली!, जोगेश्वरी स्थानकाला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:46 AM2017-10-07T05:46:59+5:302017-10-07T14:14:21+5:30
एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो
सागर नेवरेकर
मुंबई : एल्फिन्स्टन येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत अशी अनेक स्थानके आहेत, जेथे मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो. जोगेश्वरी स्थानकावरही मूलभूत पायाभूत सुविधा नाहीत, हेच समोर आले आहे. अस्वच्छ शौचालय, मोडलेले बाकडे, अरुंद पूल आणि त्यामुळे लोकल आल्यावर होणारी प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जोगेश्वरी स्थानकातील फलाटाची रुंदी, उंची कमी आहे. शिवाय छप्पर नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहून गाडी पकडावी लागते. येथील बसण्याची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर सरकत्या जिन्यांची व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ, गरोदर महिला यांना जिने चढावे-उतरावे लागतात.
सकाळी आणि सायंकाळी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंत नाही. पुलाची रुंदी कमी असल्याने गर्दीच्या वेळेस प्रवासी रेल्वे रुळावरून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावर शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होते. फलाट क्रमांक तीनवर शौचालयाची सुविधा असूनदेखील कंत्राटदार त्याकडे लक्ष देत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य आहे. रात्रीच्या वेळेस शौचालयात गर्दुल्ले एकत्र येतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा महिला प्रवाशांनी मांडली. तर कंत्राटदार शौचालयाची देखभाल करत नाही, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
फलाट दोनवर चर्चगेटच्या दिशेने असलेला पूल अत्यंत लहान असून एकाच वेळी फलाटावर दोन गाड्या आल्यावर गर्दी प्रचंड वाढते. फलाट क्रमांक एक तोडल्याने फलाट दोनवर गर्दी वाढू लागली आहे. परंतु, जागेअभावी पूल रुंदीकरणास अडथळा निर्माण होत आहे.
स्कायवॉकचे काम अर्धवट
जोगेश्वरी पूर्वेला स्कायवॉकचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव स्कायवॉकचे काम रखडले आहे. स्कायवॉक बांधण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यावर धूळ खात पडले आहे. या साहित्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. लवकरात लवकर स्कायवॉकचे काम पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
प्रवाशांना दिलासा
मालाड आणि गोरेगाव स्थानकावरून सकाळी सुटणाºया जलदगतीच्या गाड्या १ आॅक्टोबरपासून जोगेश्वरी येथे थांबा घेणार नाहीत, असे नवीन वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने काढले. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. स्थानिक नगरसेवकांच्या पत्रव्यवहाराने आणि नागरिकांच्या विरोधाने ४ आॅक्टोबरपासून काही जलदगतीच्या गाड्या धावू लागल्या. ५ आॅक्टोबरपासून सर्व गाड्या जोगेश्वरी स्थानकावर थांबू लागल्याने प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांचे हाल
शौचालयाचा अभाव, फलाटाची कमी उंची, फलाटावर छप्पर नसणे आदी समस्येसंबंधी रेल्वे प्रशासन, सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील कोणीच लक्ष देत नाही. स्थानकावर धुळीचे साम्राज्य असून अस्वच्छतादेखील खूप असते. प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने त्वरित समस्यांचे निराकरण करावे.
- मनिष पटेल,
सामाजिक कार्यकर्ता
गैरसोयीचा प्रवास : महिलांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा स्थानकावर नाहीत. फलाट क्रमांक एक तोडल्यापासून दोनवर तुफान गर्दी होते. महिलांसाठी रेल्वे प्रशासनाने डबे वाढवले पाहिजे. सकाळच्या वेळेस इतकी गर्दी होते की, काही महिला रेल्वेतून खाली पडतात. महिलांना बसण्यासाठी चांगली आसने नाहीत. सरकते जिने नसल्याने वृद्ध महिलांना खूप त्रास होतो. रेल्वे प्रवास अत्यंत गैरसोयीचा झाला आहे. - प्रियांका आलीम, प्रवासी
फलाटावर छप्पर नाही
जोगेश्वरी स्थानकावर प्रवासी अनेक प्रवासी रुळ ओलांडत. अपघात होतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन पावले उचलत नाही. पुलावर प्रचंड गर्दी होते. फलाटावर छप्पर नाही याचा त्रास पावसाळ्यात आणि उन्हातदेखील होतो. - कादर सय्यद, प्रवासी
कठोर पावले उचला
२००० सालापासून लोकलचा प्रवास करत आहे. जोगेश्वरीसारखी खराब परिस्थिती अन्य स्थानकांची नाही. एल्फिन्स्टन स्थानकावर जो वाईट प्रसंग घडला तो इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. - हेमंत बंदरकर, प्रवासी
जोगेश्वरी टर्मिनस व्हावे
जोगेश्वरी स्थानक हे टर्मिनस होऊ शकते. टर्मिनस होईल एवढी जागा रेल्वे प्रशासनाकडे आहे. वांद्रे आणि कुर्ला टर्मिनस असून बोरीवलीपासून सर्व लोकांना या ठिकाणी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यावे लागते. जोगेश्वरीला ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, बोरीवली स्थानक, अंधेरी-घाटकोपर मेट्रो ही महत्त्वाची ठिकाणे जवळ आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना दूर न जाता जवळच टर्मिनसची सोय झाली तर प्रवासाचा ताण कमी होईल. ओशिवरा आणि जोगेश्वरीच्या मध्ये काही एकर जागा आहे, त्यात टर्मिनस होऊ शकते. ती जागा अशीच पडलेली असून तेथे आता गर्दुल्ल्यांनी ठाण मांडले आहे. म्हणून टर्मिनस झाले पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
बैठकीचे आयोजन
जोगेश्वरीतील सर्व पातळ्यांवरील समस्यांसाठी सोमवारी बैठक घेतली जाईल. त्याआधी संबंधित जागेवर प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून दुपारी २.३० या वेळेत सर्व अधिकाºयांना आणि स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेतली जाईल. त्यात जोगेश्वरी स्थानकासंबंधी समस्येचीदेखील पाहणी करून लवकरात लवकर प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- रवींद्र वायकर, स्थानिक आमदार
सरकत्या जिन्यांची गरज
जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधांची गैरसोय आहे. समस्येसंबंधी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची (डीआरएम) बैठक झाली तेव्हा सर्व समस्या सांगितल्या आहेत. मध्यभागी पुलाची व्यवस्था करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांना सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, तेथे जागा अपुरी असल्याने पूल बांधणे कठीण आहे. पूल बांधता येत नसेल तर निदान सरकते जिने तरी बांधावेत.
- पंकज यादव, स्थानिक नगरसेवक
जोगेश्वरी स्थानक दुर्लक्षित
फलाटाला शेड नाही, शौचालय नाही, फलाटाची उंची कमी या गंभीर समस्या जोगेश्वरी स्थानकाच्या आहेत. १९९१ सालापासून बोरीवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव लोकल आहेत, परंतु जोगेश्वरी लोकल नाही. लोकलची मागणी कित्येक वर्षांपासून करत आहोत. त्यासाठी प्रशासनाला पत्रव्यवहारदेखील करण्यात आले आहेत. पूर्व आणि पश्चिमेकडे बाजार भरला जातो. त्यामुळे व्यापाºयांना सामानाची आयात-निर्यात करण्यासाठी रेल्वे रुळाचा वापर करावा लागतो. ७० टक्के लोक पूर्वेला येणारे आहेत. पादचारी पूल लवकरात लवकर बांधला गेला पाहिजे.
- उज्ज्वला मोडक,
प्रभाग समिती अध्यक्ष