मुंबई - मानसरोवर स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. खांदेश्वर-मानसरोवर मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे आणि अंधेरी-सीएसएमटी दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. बुधवारी (29 ऑगस्ट) सकाळी ऐन गर्दीच्यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर या दरम्यार रेल्वे रुळाला तडा गेल्याने मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल येथे तांत्रिक बिघाड झाल्याने अंधेरी-सीएसएमटी लोकलसेवा उशिराने धावत आहेत. सकाळी साडे आठच्या दरम्यान हा बिघाड झाला होता.
मध्य रेल्वेने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून खांदेश्वर-मानसरोवर रेल्वे रुळाची दुरुस्ती सुरू असल्याने लोकल उशिराने धावत असल्याची माहिती दिली. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हा बिघाड दुरुस्त केला. यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला.