शहरातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना पावसामुळे मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:20 AM2019-08-06T05:20:28+5:302019-08-06T05:20:37+5:30
सोमवारी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मुंबई : सोमवारी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असल्याने अकरावी प्रवेशाच्या तिसºया फेरीतील प्रवेश निश्चितीसाठी आणखी एका दिवसाची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया आता ७ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याची अधिकृत सूचना अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या मंगळवारी होणाºया पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे आयडॉलने जाहीर केले आहे.
सुधारित वेळापत्रक जारी होणार असले तरीही या परीक्षांचे केंद्र आयडॉल हेच राहणार आहे. आयडॉलसोबतच आयटीआयची सोमवारी होणारी परीक्षाही पुढे ढकलल्याची माहिती आयटीआयचे संचालक अनिल जाधव यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधातील अधिक माहिती परीक्षा विभागाकडून मिळू शकते, असे जाहीर करण्यात आले आहे.
एलएलबी प्रवेश प्रक्रिया आता ६ ते १० ऑगस्टदरम्यान होणार
एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी कॅप प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्जासाठी सीईटी सेलकडून अर्ज करण्याची मुदत २५ जुलै ते ५ ऑगस्ट २०१९ एवढी होती. मात्र आता या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसर ही प्रवेश प्रक्रिया ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१९ रात्री ११.५९ पर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील निकाल न लागल्याने तसेच निकाल हाती न आल्याने कॅप ऑनलाइन प्रवेशासाठी विहित मुदतीत अर्ज न करता आल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सोपे होणार आहे. मात्र, असे असले तरी यापुढे या प्रवेशांसाठी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही ती करण्यात येणार नसल्याचेही सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फाइन आर्ट्सच्या कॅप राउंड प्रवेशासाठी दिलासा
फाइन आर्ट्सच्या प्रवेशाच्या दुसºया कॅप राउंडच्या जागा विद्यार्थ्यांना अलॉट करण्यात आल्या. मात्र जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती करता न आल्याने आता दुसºया कॅप राउंडमधील विद्यार्थी ६ आणि ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत प्रवेश निश्चिती करू शकतील. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ नंतर तिसºया कॅप राउंडसाठीच्या रिक्त जागा जाहीर करण्यात येतील. मुदतवाढ देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.