पावसाचा अंदाज चुकला, इशारा मात्र कायम, हवामान खाते नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 03:54 AM2017-08-31T03:54:02+5:302017-08-31T03:54:10+5:30

मुंबई शहरासह उपनगराला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला होता.

Due to rain forecast, only warning, permanent weather account | पावसाचा अंदाज चुकला, इशारा मात्र कायम, हवामान खाते नापास

पावसाचा अंदाज चुकला, इशारा मात्र कायम, हवामान खाते नापास

Next

मुंबई : मुंबई शहरासह उपनगराला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला होता. प्रत्यक्षात मात्र, तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, मुंबईकरांचा बुधवार ‘कोरडा’च गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच अंदाज चुकल्याने हवामान खाते तोंडघशी पडले. असे असले तरीदेखील पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार
सुरू राहील. काही ठिकाणी जोरदार
ते अतिजोरदार पाऊस पडेल,
असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार कुलाबा येथे ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथे ३३१.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रादेशिक स्तरावर विचार करता, शहरात १९६.४४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात २२३.६८ आणि पश्चिम उपनगरात २२२.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता समुद्राला भरती आहे. ३.१३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. परिणामी, या काळात जर मोठा पाऊस पडला, तर मात्र, पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतील, अशी शक्यता आहे. राज्याचा विचार करता ३१ आॅगस्ट रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १, २ आणि ३ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (पूर्वार्ध)

उडालेला विश्वास; समन्वयाचा अभाव
1हवामान खात्याच्या अंदाजावर अजूनही सामान्यांचा विश्वास नाही,
हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. मुंबईतील अतिवृष्टीनंतर यावर शिक्कामोर्तबच झाले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावर विश्वास नसल्यानेच, २९ आॅगस्टला तमाम मुंबईकर घराबाहेर पडले. त्यामुळे मुंबईतील पाणीबाणीची तुलना सामान्य लोक परदेशातील हवामान यंत्रणांशी करू लागले आहेत.
2परदेशात दर दोन तासांनी हवामानाचा अचूक अंदाज सांगितला जातो. त्यानंतर, लोक त्यांच्या कामाचे नियोजनही करतात; अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकलेली नाही, पुढच्या काळातही होण्याची शक्यता धूसरच आहे.

अंदाज वर्तवणारे डॉप्लर, रडार
आपल्याकडे हवामान खात्याचे काम डॉप्लर आणि रडारवर चालते. यापूर्वी हवामान खाते ४८ तासांचा अंदाज वर्तवित होते. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत, हवामान खाते आता ७२ तासांचा अंदाज वर्तवित आहे. आपत्कालीन स्थिती निर्माण होते, तेव्हा उर्वरित सर्व यंत्रणांना अलर्ट करण्याचे काम हवामान खाते करते. मुंबई पालिका, एमएमआरडीए, म्हाडा, विमान प्राधिकरण अशा प्रमुख घटकांशी समन्वयाचा प्रयत्न हवामान खात्याकडून केला जातो. मात्र, हे काम नीटनेटके होत नाही; त्यातच हवामानाच्या लहरीसमोर खात्याचा निभाव लागत नाही. परिणामी, मुसळधार पावसात मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होते.

अमेरिका, आॅस्ट्रेलिया प्रगत
अमेरिका, आॅस्ट्रेलिया अशा अनेक प्रगत देशांमध्ये हवामान खाते खूप प्रगत आहे. तेथे दर तासांनी हवामानाचा अंदाज दिला जातो. त्यानुसारच लोक पुढील नियोजन करतात. त्यांच्या तुलनेत आपण काही नसलो, तरी काही प्रमाणात का होईना, मागील दहा वर्षांत आपण समाधानकारक प्रगती केली आहे. विशेषत: चेन्नईला त्सुनामीचा तडाखा बसला, तेव्हा या घटनेतून हवामान खात्याने मोठा धडा घेतला आणि वेगाने कामाला लागले. हवामान खात्यात मोठ्या त्रुटी आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र, तुलनेने आपण प्रगत देशांच्या खूप मागे आहोत. अंदाज चुकण्यामागे हवामानाचा लहरीपणा कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान खाते अद्ययावत
हवामान विभागाकडे अत्याधुनिक यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे हवामान विभागाचे अंदाज अनेकदा चुकत नाहीत. हवामान विभाग इतर पाश्चात्य आणि प्रगत देशांतील हवामान विभागांसोबत माहितीची देवाण-घेवाण करतो. आमच्या माहितीमध्ये जर त्रुटी असतील, तर जागतिक स्तरावर आमच्या माहितीला स्थान दिले जाणार नाही. आमच्याकडे असणारी माहिती आणि तंत्रज्ञान पूर्णपणे जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाशी स्पर्धा करेल इतके चांगले आहे, असाही दावा हवामान खात्याने केला आहे.

‘लांडगा आला रे आला...’
अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या
सोशल मीडियावर चक्रीवादळ येणार, अतिवृष्टी होणार, अशा प्रकारचे संदेश येतात. या संदेशांना काहिती अर्थ नसतो. हवामान विभागाचे नाव वापरून हे संदेश पाठविलेले असतात. अनेकदा लोक यावर विश्वास ठेवतात. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडत नाही. त्यामुळे लोकांचा हवामान विभागाबाबतचा विश्वास कमी होतो आणि जेव्हा हवामान विभाग स्वत: अधिकृतपणे अशा प्रकारच्या आपत्तीबाबतची माहिती देते. तेव्हा लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला...’ सारखी परिस्थिती उद्भवते. अशा प्रकारचे खोटे संदेश व्हायरल होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस पावले
उचलणे गरजेचे आहे, असेही हवामान खात्याकडून
सांगण्यात आले.

Web Title: Due to rain forecast, only warning, permanent weather account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.