Join us

वसईत मतदानावर पावसाचे सावट

By admin | Published: June 13, 2015 10:50 PM

महानगरपालिकेची दुसरी निवडणूक अत्यंत चुरशीने लढविली गेली असून तिचे मतदान रविवारी होत आहे. १११ जागांसाठी झुंज

वसई : महानगरपालिकेची दुसरी निवडणूक अत्यंत चुरशीने लढविली गेली असून तिचे मतदान रविवारी होत आहे. १११ जागांसाठी झुंज देत असलेल्या १० राजकीय पक्षांच्या ३६७ उमेदवारांचे भवितव्य याद्वारे मतपेटीत बंद होणार आहे. शुक्रवारपासून सुरु असलेल्या पावसाचे सावट या मतदानावर असल्याने उमेदवारांत धाकधूक आहे.अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीतील प्रचार अत्यंत शांततेत पार पडला. हे ध्यानात घेता मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडेल. अशी चिन्हे आहेत. पहिली निवडणूक जशी एकतर्फी पार पडली. तसे चित्र यावेळी नव्हते. देशात आणि राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनाची झलक या प्रचारात पहायला मिळाली. एकीकडे शिवसेना-भाजप युतीने आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांना प्रथमच आव्हान दिले. यापैकी युतीचे आव्हान जास्त प्रखर होते. यातही शिवसेनेचा जोर अधिक होता. त्यामुळे जनतेला पहिल्यांदाच या निवडणुकीत पर्याय उपलब्ध होते.शिवसेनेने पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख अनंत तरे यांना प्रचारात उतरविले होते. तर भाजपने पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा व आमदार पास्कल धनारे यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवली होती. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीयमंत्री आॅस्कर फर्नांडिस, माजी खासदार संजय निरुपम, हुसेन दलवाई यांना प्रचारात उतरविले होते. राष्ट्रवादीतील एकही नेता प्रचारासाठी फिरकला नाही. आघाडीच्या प्रचाराची मदार स्थानिक नेत्यांवरच होती. या निवडणुकीत आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पत्नी प्रविणा यांना बिनविरोध निवडून आणून महापौर बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे मतदारांनी जर घराणेशाही विरोधात कौल दिला तर, बविआची पंचाईत होऊ शकते. येथे संमिश्र स्वरुपाचा मतदार आहे. त्यातही विवेक पंडित आणि त्यांची श्रमजीवी संघटना यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यांचे पाठीराखे कुणाला मतदान करतात यावर बरेच अवलंबून असेल. फर्नांडिसांच्या दौऱ्यामुळे ख्रिश्चन मते जर काँग्रेसकडे वळली तर निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते.मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यतादुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पावसाचे सावट असल्याने मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे,मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यावरूनच मतदानाची आकडेवारी ठरणार आहे. रविवार असल्याने मतदार बाहेर निघतील अशी अपेक्षा उमेदवारांना आहे.कर्मचाऱ्यांची लगबग : ६२० मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर केंद्राधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रावर पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग होती.