यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई तुंबण्याची सत्ताधाऱ्यांनाच भीती!, नालेसफाईची कामे अर्धवट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:33 AM2019-05-09T03:33:03+5:302019-05-09T03:33:19+5:30
महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे.
मुंबई : महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाचा आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नाल्यांची ३५ ते ४० टक्के सफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी नालेसफाईच्या कामाबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे चिंता व्यक्त केली. मुंबईतील अनेक भागांमध्ये नाले डेब्रिजने भरलेले आहेत. त्यामुळे यंदा पहिल्या पावसातच मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. महापौरांच्या वॉर्डातील नालेही गाळातच असल्याचे सदस्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून भाजपने नालेसफाईच्या कामांची पाहणी सुरू केली आहे. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. या कामांबाबत शिवसेनेनेही असमाधान व्यक्त केले. एफ उत्तर विभागात थोड्या पावसातही पाणी तुंबते. येथे नालेसफाई झालेली नाही. काही ठिकाणी गाळ नाल्यांच्या बाजूला पडला असून, तो अद्याप उचलला गेला नाही, असे सदस्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे नालेसफाईची डेडलाइन चुकण्याची भीती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली.
प्रशासनाची सारवासारव
नालेसफाईची कामे ३५ ते ४० टक्के झाली आहेत. यंत्रणा कमी पडेल तेथे व्यवस्था करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. ३ तारखेला आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत पावसापूर्वीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी या वेळी सांगितले.
‘सफाईची गती मंदावली;
अहवाल सादर करा’
नालेसफाईच्या कामांची गती मंदावली आहे. नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्द्याकडे लक्ष देऊन अधिकाºयांनी काम वेगाने करून घ्यावे. येत्या सोमवारी नालेसफाईच्या कामांचा अहवाल सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
मेट्रो कामांची पाहणी करावी
मुंबईत सर्वत्र मेट्रोची कामे सुरू आहेत. अशा कामांची अधिकाºयांनी पाहणी करावी. ई विभागात रस्ते, नाल्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात पाणी भरल्यास या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याची नाराजी समाजवादीचे रईस शेख यांनी व्यक्त केली.