लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्रावण महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे होत असतात. याच पार्श्वभूमीवर मात्र ट्रॅव्हल्सचे दर वाढविण्यात आले आहेत. सध्या अनेकजण सणानिमित्त मुंबईतून गावी किंवा गावातून मुंबईत येत असतात. औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, पुणे येथून मुंबईला येत असताना किंवा मुंबईतून गावी येत असताना डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ट्रॅव्हलचे दर वाढवण्यात आले आहेत. सध्या हे दर हजाराच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा मात्र फटका बसत आहे.
राखी पौर्णिमा तसेच श्रावणात असलेल्या अनेक सण-उत्सवांमुळे अनेकजण आपल्या गावी जात असतात किंवा गावातून मुंबईसारख्या शहरामध्ये परतत असतात. मात्र ट्रॅव्हल्सच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या काही काळामध्ये ट्रॅव्हल्सचे दर वाढले नव्हते. वाढत्या डिझेलच्या भावाचा फटका ट्रॅव्हल्सच्या कंपनीनाही बसत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे मार खात असलेला धंदा डिझेलच्या भावामुळे अजून तोट्यात गेला आहे.
सण-उत्सवांमुळे ट्रॅव्हलच्या संख्येमध्ये काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाकाळात २० ते २५ बसच्या संख्येमध्ये घटही झाली आहे. पहिल्यापेक्षा सातारा मुंबई, कोल्हापूर-मुंबई, औरंगाबाद-मुंबई या मार्गावर बसच्या संख्येमध्ये २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. डिझेलच्या वाढत्या दरामुळे लोक पैसे देण्यात कचरत आहेत.
सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल्सच्या दरामध्येदेखील वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण धंदा ठप्प झाला होता. डिझेलचे दर वाढल्यामुळे आमचे कंबरडे मोडले आहे. लोक पैसे देण्यात कचरत आहेत. डिझेलच्या वाढत्या दरामुळे आम्हालाही आमचे दर वाढवावे लागले आहेत.
- मृत्युंजय पांडे