रमजानमुळे मोहम्मद अली मार्गावरील खजूरविक्रीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:52 AM2018-05-29T00:52:58+5:302018-05-29T00:52:58+5:30
रमजान महिन्यात मुस्लीम नागरिकांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी खजूर अत्यावश्यक आहे. खजूर खाऊन रोजा सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते
खलील गिरकर
मुंबई : रमजान महिन्यात मुस्लीम नागरिकांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी खजूर अत्यावश्यक आहे. खजूर खाऊन रोजा सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे रमजान सुरू असल्याने खजूर विक्रीमध्ये वाढ झाली आहे. बाजारात १०० रुपये प्रति किलो दरापासून तब्बल अडीच हजार रुपये प्रति किलो दराचे खजूर उपलब्ध आहेत. वर्षभरात खजुराची जितकी विक्री होते तेवढी विक्री केवळ रमजान महिन्यात होते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
जायदी म्हणजे लाल खजूर म्हणून ओळखला जाणारा खजूर १०० ते १२० किलो दराने उपलब्ध असून अजवा या प्रकारातील खजूर २ हजार ते अडीच हजार रुपये दराने बाजारात मिळत आहे. इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी अजवा खजुराचे झाड लावले होते, त्यामुळे या खजुराला जास्त धार्मिक महत्त्व आहे. अजवा खजूर अतिशय महाग असल्याने त्याच्या विक्रीला काहीशी बंधने येतात, मात्र त्याचे धार्मिक महत्त्व जास्त असल्याने श्रीमंत वर्गाकडून त्याची खरेदी केली जाते. अनेक रोगांवर हा खजूर गुणकारी असल्याने त्याची किंमत जास्त असल्याची माहिती खजूर विक्रेते युसूफ खजूरवाला व नजीर हुसैन यांनी दिली. मोहम्मद अली मार्गावरील मिनारा मशिदीच्या गल्लीत त्यांचा गेल्या ४० वर्षांपासून खजूर विक्रीचा व्यवसाय आहे. वर्षभरात खजूर विक्री होते तेवढी विक्री केवळ रमजानमध्ये एका महिन्यात होते. रमजान काळात या भागातील विविध दुकाने दुपारी १२-१ वाजता सुरू होतात व पहाटे सेहरी करण्याच्या वेळेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत सुरू राहतात. मोहम्मद अली मार्गावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांमधील मुस्लीम व मुस्लिमेतर व्यक्तीदेखील वैद्यकीय कारणांमुळे मोठ्या प्रमाणात खजूर खरेदी करतात, असे सांगण्यात आले.
किमिया या प्रकारच्या खजुराला सर्वाधिक मागणी आहे. या खजुराची विक्री किलोऐवजी नगावर केली जाते. त्याच्या ४८ खजूर असलेल्या पाकिटाची विक्री १८० ते २०० रुपयांना केली जाते. कलमी खजूर, मस्कती काला खजूर, इराणी, ओमानी खजूर, याशिवाय खजुराच्या झाडाच्या फांदीसह देखील काही खजूर मिळतात. वाशी येथील होलसेल मार्केटमधून हे विक्रेते खजूर खरेदी करतात. सौदी अरेबिया, इराण, इराक, ओमान या आखाती देशांतून मुंबईत खजूर आणला जातो. सीडलेस खजूरदेखील बाजारात उपलब्ध आहे.
खजुराचे वैद्यकीय महत्त्व आहे. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर मोठ्या प्रमाणात असते. रोजा सोडताना (इफ्तारी करताना) खजूर खावा असे प्रेषितांनी सांगितलेले असल्याने प्रत्येक घरात इफ्तार करताना खजूर खाल्ला जातो.