मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापैकी १० फे-या हार्बर मार्गावर आणि १६ फे-या ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपासून या लोकल फे-या सुरु होणार आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान धावणाºया हार्बर मार्गावरुन सुमारे दहा लाख प्रवासी रोज प्रवास करतात. तर ठाणे आणि नवी मुंबई स्थानकांना जोडणा-या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून लोकल फे-या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. २६ वाढीव फे-यांमुळे हार्बर वरील लोकल फे-यांची संख्या ६०४ वरुन ६१४ झाली आहे. तर ट्रान्स हार्बरवरील लोकल फे-यांची संख्या २४६ वरुन २६२ झाली आहे. तर मध्य रेल्वेवर रोज होणा-या एकूण लोकल फे-यांची संख्या १७०६ वरुन १७३२ वर पोहचली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव हार्बर विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापही या मार्गावरुन लोकल चालवण्याची परवानगी मिळालेली नाही. परिणामी तूर्तास तरी अंधेरी-गोरेगाव लोकल सुरु झालेली नाही. परिणामी मध्य रेल्वेने ‘प्लॅन बी’ नूसार हार्बर मार्गावरील वाढीव फे-या वडाळा येथून चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वेने दिली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ अ या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे हार्बर रेल्वेला नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात हार्बर मार्गावरील सीबीटीसी सिग्नल यंत्रणेसाठी १ हजार ३९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर गोरेगाव-बोरीवली हार्बर विस्तारणीकरणासाठी ८४६ कोटींची तरतूद आहे. त्याच बरोबर १२ हजार ३३१ कोटींचा सीएसएमटी-पनवेल उन्नत प्रकल्पाचा समावेश देखील यात असल्यामुळे या प्रकल्पामुळे हार्बर सह उपनगरीय लोकलचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे.