मुंबई : फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना रेल्वे प्रशासन पेपर विक्रेत्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी दिले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाकडून होणा-या कारवाईसंदर्भात त्यांची भेट घेतली असता जैन यांनी हे आश्वासन दिले आहे. शिवाय दोन दिवसांत हार्बर व वेस्टर्न रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसोबत चर्चा करून कारवाई न करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचेही जैन यांनी स्पष्ट केले.२९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन स्थानकातील पादचारी पुलावर घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीत वावरणाºया फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. मात्र त्याचा फटका रेल्वे हद्दीतील वृतपत्र विक्रेत्यांना बसत असून, काही विक्रेत्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकांबाहेर वृत्तपत्र विक्रेते व्यवसाय करत आहेत. महापालिकेनेही त्यांचा उल्लेख फेरीवाले म्हणून केलेला नाही. तरीही रेल्वे प्रशासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना ‘फेरीवाले’ म्हणून संबोधित करून कारवाई केली जात आहे. सदर कारवाई थांबवण्याची विनंती शिष्टमंडळाने केली आहे.बंदच्या काळात तसेच आपत्कालीन वेळेत अत्यावश्यक माहिती पुरवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करतात. इतकेच नव्हेतर नागरिकांमध्ये जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्यही विक्रेते करत असतात. अन्य विक्रेत्यांप्रमाणे त्यांची गणना करून त्यांविरोधात कारवाई करणे, समाजाच्या दृष्टीने अन्यायकारक होईल, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे. या शिष्टमंडळात मुंबई-ठाणे वृत्तपत्र एकीकरण समितीचे पदाधिकारी अजित पाटील, अजित सहस्रबुद्धे, सी.एल. सिंग, योगी चव्हाण, संतोष ठाकरे, सुशांत वेंगुर्लेकर, अनिल राणे, घनश्याम यादव, अमृत काटकर, शैलेश कदम आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे अशोक गोवेकर, जीवन भोसले, भालचंद्र पाटे यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्थित होते.
पेपर विक्रेत्यांना रेल्वेचा दिलासा, कारवाई न करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:50 AM