Join us

वरिष्ठांंच्या तंबीमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादाला काहीसा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:11 AM

मुंबई : पोलीस ठाण्यातील असलेल्या हद्दीच्या वादांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत होते. वरिष्ठाकड़ून वेळोवेळी ...

मुंबई : पोलीस ठाण्यातील असलेल्या हद्दीच्या वादांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत होते. वरिष्ठाकड़ून वेळोवेळी मिळणाऱ्या तंबीमुळे सध्या बऱ्यापैकी हद्दीच्या वादाला मुंबईत आळा बसलेला आहे. विशेषता महिलांसंबंधीत गंभीर गुह्यांत गुन्हा नोंदवत तो तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येताना दिसत आहे.

गुन्हा घडल्यानंतर तो कुठल्या हद्दीत घडला असा प्रश्न आधी पोलिसांकड़ून विचारला जायचा. अशात, ज्याठिकाणी गुन्हा घडला, त्या पोलीस ठाण्यात तक्रारदाराला पाठविण्यात यायचे. मात्र, पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी विशेषता महिलांसंबंधीत गंभीर गुह्यांत अशाप्रकारे हद्दीचा मुद्दा मांडणाऱ्यांंना तंबी देण्यात आली. त्यामुळे महिलांची तक्रार नोंदवून पुढे ती संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे.

मात्र दुसरीकडे अनेक किरकोळ गुन्हे किंवा फसवणुकी संदर्भातील प्रकरणात घराजवळच्या पोलीस ठाण्यात अर्ज घेऊन जाणाऱ्यांंना गुन्हा घडला त्याठिकाणच्या पोलीस ठाण्याचा रस्ता काही पोलिसांकड़ून दाखवण्यात येतो. त्यामुळे हे पूर्णत: बंद होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

....

पोलीस ठाणे : ९४

पोलीस अधिकारी / कर्मचारी : ४५ हजार

....

दखलपात्र गुन्हा दाखल करून घेणे बंधनकारक

सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे तिथेच दखलपात्र गुन्हा असल्यास दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास झिरो एफआयआर नोंदवत, पुढे तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. असे न केल्यास गंभीर गुन्ह्यांत त्या पोलिसावरही कारवाई होऊ शकते.

ॲड. प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी वकील

....