मुंबई : शहर आणि उपनगरात दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक, विकासात्मक प्रकल्पे, वाढते बांधकाम यामुळे धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर/पीएम) प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना धूलिकणांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कारणासह आता फटाक्यांच्या धूराने आणि रासायनिक कणांमुळे मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. ‘सफर’ हे संकेतस्थळ हवेतील धूलिकणांचा आढावा घेते़ त्यांच्या अहवालानुसार फटाक्यांमुळे धूलिकणांचे प्रमाण मुंबईत वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फटाके फोडण्यास सुरुवात होते. धनत्रयोदशीपर्यंत शहर आणि उपनगरात जास्त फटाके फोडले गेले नाहीत. मात्र नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्यादिवशी सकाळपासून फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याने हवेत धूलिकणांची संख्या वाढली. परिणामी हवेचा दर्जा ढासळत आहे. याआधी उष्णता आणि वाढती बांधकामे यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले होते. यात भर आता फटाक्यांची पडल्याने हवेची गुणवत्ता खराब असल्याचे सफर संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे़. प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हवेची गुणवत्ता ढासळत चालली असल्यामुळे तसेच प्रदूषण वाढत असल्यामुळे याचा त्रास मुंबईकरांना नाहक सहन करावा लागणार आहे. त्यांच्या आरोग्यावर ढासळत चाललेल्या हवेच्या दर्जाचे दुष्परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.आधीच आॅक्टोबर महिना संपूनही उनाचा कडाका कायम आहे. दिवाळी सुरू होऊनही थंडीचे आगमन न झाल्यामुळे वाढत्या उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यातच या सतत बदलत राहणाऱ्या वातावरणाचा फटकाही मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. प्रदूषणामुळे अबालवृद्ध सर्वांच त्रस्त असून त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.फटाक्यांचा धूरमुंबई शहरातील माझगाव, पश्चिम उपनगरातील अंधेरी, बोरीवली, मालाड, पूर्व उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल,भांडुप, चेंबूर आणि नवी मुंबई येथे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. बुधवारी दुपारी अंधेरीत धूलिकणांचे प्रमाण ३५६ पीएम नोंदविण्यात आले, तर रात्री ८.३० पर्यंत हे प्रमाण ३५२ वर पोहोचले होते. मात्र, दोन्ही वेळचे प्रमाण खूप खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसासह रात्री फटाके फोडले जात असल्याने प्रदूषित कण आणि धूर वातावरणात मिसळत आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, अंधेरी परिसराला धूलिकणांनी घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 6:31 AM