रस्ता रुंदीकरणामुळे करदात्यांना दिलासा
By admin | Published: January 12, 2015 10:23 PM2015-01-12T22:23:18+5:302015-01-12T22:23:18+5:30
विरार शहराच्या पश्चिमेकडील प्रभाग क्र. ६ मध्ये गेल्या १० वर्षांत शेकडो नागरी संकुले उभी राहिली.
वसई : विरार शहराच्या पश्चिमेकडील प्रभाग क्र. ६ मध्ये गेल्या १० वर्षांत शेकडो नागरी संकुले उभी राहिली. एकेकाळी बोळिंज ग्रामपंचायत क्षेत्रात समाविष्ट असलेल्या या प्रभागाची लोकसंख्या साडेतीन ते चार हजारांच्या घरात होती. आजच्या घडीला ही लोकसंख्या ४० हजारांच्या घरात पोहोचली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात नागरीकरण होऊनही इतर प्रभागांप्रमाणे या प्रभागाला बकालपणाचा शाप लागला नाही. अर्थात, बांधकाम करताना शहर नियोजनाकडेच लक्ष देण्यात आल्यानेच प्रभागात आजवर अनेक विकासकामे मार्गी लागली.
रस्ते, गटारे, समाजमंदिरे, रस्ता रुंदीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन साफसफाई ही कामेही प्रभावीरीत्या झाल्याने या प्रभागातील करदाते प्रशासनाबद्दल समाधानी आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे झाले असले तरी अन्य विकासकामे महानगरपालिकेच्या माध्यमातूनच झाली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी सुविधा काही प्रमाणात अपुऱ्या असल्या तरी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण नाही. यापूर्वीच्या बोळिंज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामे होत असत, परंतु ते पुरेसे नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. महानगरपालिका आल्यानंतर मात्र जवळपास सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रभागाच्या जुन्या भागात अद्याप महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेचे पाणी दिले जात नाही. ग्रामस्थांकडून मुख्य जलवाहिनी टाकणे व गृहनिर्माण संस्थांना जोडण्या देणे या कामासाठी आवश्यक असलेले शुल्क स्थानिकांकडून अदा केले जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना मार्गी लागत नाही. याप्रश्नी नगरसेवक नितीन मुळे यांनी नागरिकांची समजूत काढून ही योजना मार्गी लागावी, यासाठी सतत प्रयत्न चालवले आहेत. त्यास यश आल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो. यंदा महानगरपालिकेच्या प्रभागांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे या प्रभागांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. बोळिंज, गोकूळ टाऊनशिप, न्यू विवा कॉलेज, खारोडी ते थेट करमाळे हद्दीपर्यंत असलेल्या या प्रभागांचे दोन प्रभाग होण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे तत्कालीन बोळिंज ग्रामपंचायत व त्यानंतर महानगरपालिकेच्या २ जागांवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे.