नवी मुंबई : शहरातील बहुतांश हॉटेलचालकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. चार महिन्यांसाठी परवानगी असलेले पावसाळी शेड अद्याप हटविण्यात आलेली नाहीत. पालिकेच्या नोटिसीकडेही व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले असून शेडचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. पावसाचे पाणी हॉटेलमध्ये येवून ग्राहकांना त्रास होवू नये यासाठी महापालिका व्यावसायिकांना पावसाळ्यातील चार महिने दुकानाबाहेर शेड टाकण्यास परवानगी देत असते. पावसाळी शेड ३० सप्टेंबरनंतर संबंधित हॉटेल व इतर व्यावसायिकांनी स्वत:हून काढणे आवश्यक असते. परंतु नवी मुंबईमध्ये या सुविधेचा व्यावसायिक गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिक पावसाळ्यात शेडची परवानगी घेतात व सदर शेड वर्षभर तसेच ठेवले जाते. या शेडचा व्यावसायिक वापर करण्यात येत आहे. अनेकांनी शेडखाली टेबल, खुर्च्या ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. काहींनी किचन तर काहींनी स्टोअर रूम तयार केली आहे. अनेक व्यावसायिकांनी फास्टफूड, पानटपरी व इतर व्यावसायिक कामांसाठी या जागेचा वापर सुरू केला आहे. वाशीतील नवरत्न हॉटेलचालकांनी पानटपरी, ग्राहकांना बैठक व्यवस्था व भांडी ठेवण्यासाठी वापर सुरू केला आहे. वैदेही बारमध्ये या जागेमध्ये मद्यपानासाठी उपयोग सुरू आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील जवळजवळ सर्वच हॉटेल चालकांनी शेडचा चुकीचा वापर केला आहे. तर याच परिसरातील पोलीस स्टेशनजवळ असलेल्या एक हॉटेलने अधिकृत जागेत वातानुकूलित व अतिक्रमण केलेल्या जागेचा इतर ग्राहकांसाठी वापर सुरू केला आहे. नेरूळमधील हॉटेल परिसरात मार्जिनल स्पेसमध्ये पावसाळी शेड टाकून व्यवसाय सुरू केला आहे. बेलापूर, कोपरखैरणे व इतर सर्वच परिसरामध्ये हीच स्थिती आहे.वास्तविक आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेड व्यावसायिकांनी स्वत:हून काढून टाकणे आवश्यक आहे. महापालिकेने तशा नोटीसही दिल्या आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात नाही. (प्रतिपिधी)
हॉटेलचालकांनी बसवले नियम धाब्यावर
By admin | Published: November 07, 2014 1:17 AM