Join us

खाडीसह समुद्रकिनारी स्थलांतरित पक्ष्यांची होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:40 AM

पालघर जिल्ह्यात पक्ष्यांचा समृद्ध वारसा । खारफुटी संरक्षणासह, स्थानिक वृक्ष लागवडीची गरज

अनिरु द्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : पालघर जिल्ह्याला पक्ष्यांचा समृद्ध वारसा लाभला असून, प्रत्येक ऋतूूनुसार नानाविध जातींचे परदेशी स्थलांतरित पक्षी दृष्टीस पडतात. या उन्हाळ्यात झाईपासून ते वसईपर्यंत खाडी व समुद्र किनाऱ्यालगत विविध जातींच्या दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरली आहे.

जिल्ह्यातील खाडी आणि समुद्रकिनारी खडकाळ व दलदलीचे भाग, कांदळवन या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आढळून आला आहे. त्यामध्ये फ्लेमिंगो, उलट चोचीचा तुतारी, रंगीत तुतारी, हिरवा तुतारी, राखी चिखल्या, सोन चिखल्या, चातक, नवरंग, काळा बगळा, पांढरा अवाक, निलपंख, पिवळ्या पायाची हरोळी अशा विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणूतील किनारी भागात दुर्मीळ असणाºया नारंगी छातीच्या हरिअल पक्ष्याचे दर्शन झाले होते. या वेळी घरट्याशेजारी पक्ष्याची दोन पिल्लेही दिसली. राज्यात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात त्याचे वास्तव्य असल्याचे चिंचणीतील पक्षी निरीक्षक भावेश बाबरे यांनी सांगितले.परदेशी पक्ष्यांची नावे आणि त्यांचा परिचय इंटरनेटच्या माध्यमातून समजायला सोपे झाले आहे. जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांनी मोबाइलच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुपही तयार केले असून, अशा पक्ष्यांचे फोटो आणि आढळून आलेल्या परिसराची माहिती शेयर केली जाते. त्याचा पक्षी अभ्यासाकरिता फायदा होतो. शिवाय याद्वारे नोंदी ठेवण्यास सुलभ होत असल्याचे पक्षी निरीक्षक शैलेश अंब्रे यांनी सांगितले.

डहाणूतील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या चौपाट्या पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहेत. किनाºयावर गर्द सुरूच्याबागा असल्याने पक्ष्यांचा वावर या भागात आहे, याबाबत स्थानिक कमालीचे संवेदनशील असल्याने पर्यटकांचा धांगडधिंगा खपवून घेतला जात नाही. त्यामुळे या पक्षी वैभवाला धोका पोहोचत नसल्याची माहिती बोर्डीतील पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर निखिल चुरी यांनी दिली.काय हवे ?: स्थानिक भागातील पक्ष्यांची माहिती असलेले फलक डहाणू वन विभागाने सुरूच्या बागांमध्ये लावले आहेत. तसेच, स्थलांतरित पक्ष्यांची माहिती दिली पाहिजे. कांदळवन परिसरात विशिष्ट जागा निश्चित करून पक्षी निरीक्षणाची संधी मिळायला हवी. पक्षी वैभवाचे संरक्षण आपसूकच केले जाईल, शिवाय पर्यटनाचे नवे दालन निर्माण होईल.काय नको ?: औद्योगिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी खाडी परिसर प्रदूषित करतो. समुद्रातील रेती चोरी थांबविणे व कांदळवन संरक्षणाला प्रथम प्राधान्य देत, कठोर कारवाईची गरज आहे. डहाणूत पर्यावरण संरक्षण प्राधिकरण लागू असताना, समुद्रकिनाºयालगतच्या पाणथळ जागांवर भराव घालून होणारे बांधकाम थांबविले पाहिजे. 

पालघर जिल्ह्यात पक्ष्यांकरिता पोषक असा खाडी आणि समुद्रकिनारा आहे. कांदळवनात पक्ष्यांचे प्रमाण अधिक दिसते. किनाºयावर सुरूच्या बागांप्रमाणेच ताड, नारळ, वड, जांभूळ, कडुनिंब आदी स्थानिक झाडांची लागवड पक्षांच्या अधिवासाकरिता आवश्यक आहे.- भावेश बाबरे, पक्षी निरीक्षक व फोटोग्राफर