Join us  

तळीराम सुरक्षारक्षकामुळे यंत्रणा वेठीस

By admin | Published: March 31, 2017 3:52 AM

नोकरीवरून काढल्याच्या रागात तळीराम सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षकांमध्ये रंगलेला वाद थेट समुद्रकाठी पोहोचला.

मुंबई : नोकरीवरून काढल्याच्या रागात तळीराम सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षकांमध्ये रंगलेला वाद थेट समुद्रकाठी पोहोचला. याच भांडणातून त्यातील एक समुद्रात बुडाल्याच्या माहितीने संबंधित यंत्रणेची झोप उडाली. पहाटेपर्यंत या तळीरामाचा शोध घेतला. मात्र सकाळी हा तळीराम घरात मस्तपैकी झोपला असल्याच्या माहितीने वांद्रे पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ ओढावली. संजय शुक्ला हा रेक्लेमेशन मैदानावर सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून काम करतो. रहीम शेख हा त्याच मैदानावर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. शुक्लाने पाच दिवसांपूर्वी शेखला कामावरून काढून टाकले. याचाच जाब विचारत शेखने बुधवारी रात्री शुक्लासोबत भांडण सुरू केले. या वेळी मित्र लक्ष्मण पाण्डेय दोघांची समजूत काढत होता. तिघेही दारूच्या नशेत होते. दोघांचेही हे भांडण थेट समुद्रकाठी पोहोचले. यातच दोघे खाली पडले. यातील शेखला पाण्डेयने बाहेर काढले. मात्र शुक्ला दिसेनासा झाल्याने पाण्डेय घाबरला. शेखनेही तेथून पळ काढला. या घटनेनंतर पाण्डेयने थेट वांद्रे पोलीस ठाणे गाठले. सुरक्षारक्षकांच्या भांडणात एक जण समुद्रात बुडाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. पहाटे उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र शुक्लाचा काही शोध लागला नाही. अशात सकाळी पाण्डेयला आलेल्या फोनमुळे पोलीसही चक्रावले. मुळात तो फोन शुक्लाचा होता. घरात गाढ झोप काढल्यानंतर रात्री शेखचे काय झाले, हे विचारायला शुक्लाने तो कॉल केला होता. पाण्डेयने याबाबत पोलिसांना कळविले. मुळात जेव्हा पाण्डेय पोलिसांकडे आला तेव्हाच शुक्ला भीतीने किनाऱ्याचा आधार घेत बाहेर पडला होता आणि त्याने थेट घर गाठले आणि झोपी गेल्याची माहिती तपासात समोर आली. या प्रकरणी दोघांमध्ये हाणामारी झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)