दीपक मोहिते, वसईमहानगरपालिकेचा प्रभाग क्र. ८८ हा वसई गावामध्ये आहे. या मधून बहुजन विकास आघाडीचे केतन पाटकर हे निवडून आले आहेत. गेल्या साडेचार वर्षामध्ये या प्रभागामध्ये १२ कोटी रू. विकासकामावर खर्च करण्यात आल्याचा दावा नगरसेवक पाटकर यांनी केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने समाज मंदिर बांधणे, रस्ते, गटारे, नाल्यावर स्लॅब बांधणे इ. विकासकामाचा समावेश आहे. दररोज कचरा उचलण्याचे काम नित्यनेमाने होत असते. परंतु जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता डंपिंग ग्राऊंड व यंत्रणा नसल्यामुळे हा समुद्रकिनाऱ्या इतस्तत: टाकण्यात येतो. अधूनमधून या कचऱ्याला आगी लावण्याच्या घटनाही घडल्या आहेत.या प्रभागामध्ये झेंडाबाजार, भंडारआळी, कॉन्व्हेंट, शाळा ६० फुटी शेड व किल्ल्यातील कस्टम कॉलनी इ. परीसराचा समावेश आहे. पूर्वी नगरपरिषद असताना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे कामे योग्य प्रमाणात होऊ शकली नाहीत. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर मात्र अनेक कामे मार्गी लागली. या प्रभागात गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण कमी आहे. स्थानिकांची स्वत:ची घरे व विहिरी असल्यामुळे पाणीटंचाई असूनही त्याची तीव्रता जाणवत नाही. इतर प्रभागाप्रमाणे या प्रभागातही पाण्याची समस्या आहे. परंतु विहीरी असल्यामुळे नागरीकांना टँकर विकत घ्यावे लागत नाही. परंतु भविष्यात या प्रभागातही पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. या प्रभागालगत असलेल्या मनपाच्या डी. अेम. पेटीट रूग्णालयाच्या वैद्यकीय सेवेसंदर्भात अनेक आक्षेप आहेत. या रूग्णालयामध्ये नागरीकांना योग्य त्या वैद्यकीय सेवा देण्यात येत नसल्याबाबत सतत ओरड होत असते परंतु त्याचा इन्कार नगरसेवक केतन पाटकर यांनी केला आहे.
मालकीच्या विहिरींमुळे टंचाई कमी
By admin | Published: February 25, 2015 10:40 PM