आकाश गायकवाड, कल्याण वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त खेळमेळा आयोजित केला जातो. तसाच मेळा यंदाही सुरू होता. त्यासाठी ज्युनिअर आणि सीनिअर केजीतील ४०० मुले आणि साधारण ६०० पालक अशा हजारेक व्यक्ती उपस्थित होत्या. सकाळी १० च्या सुमारास सुरू झालेला हा आनंदमेळा दुपारी १ च्या दरम्यान संपला. त्याला शाळेचे व्यवस्थापक, प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पूर्वेतील सेंट मेरी शाळेतील लंगडीत राष्ट्रीयपदक मिळवलेले तन्मय बेळमकर आणि प्रेरणा दास हे लहान विद्यार्थीही उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त हवेत सोडण्यासाठी, सजावटीसाठी शाळेच्या क्रीडांगणात फुगे लावले होते. लहान मुलांना गॅसचे फुगे देण्यासाठी शाळेतर्फेच खासगी फुगेवाला बोलवण्यात आला होता आणि तोच फुगेवाला तेथे फुगेविक्रीचा धंदा करू लागला. दरवेळी हा फुगेवाला शाळेच्या मुख्य गेटबाहेर असतो. मात्र, यंदा शाळेने फुगेविक्रेत्याला थेट क्र ीडांगणात बोलवल्याने पालकही आश्चर्य व्यक्त करीत होते. शाळेच्या ‘खेळमेळा’ कार्यक्र मात लंगडी, खोखो, दोरीच्या उड्या, धावणे, रिंगउड्या आदी खेळ पार पडले. साधारण १ नंतर छोटीछोटी मुले आणि पालक, मुलांचे नातलग, मित्र मंडळी घरी निघाले. त्याच वेळी शाळेच्या क्रीडांगणाबाहेर फुग्यांमध्ये गॅस भरणारा सिलिंडर आणि रंगीबेरंगी फुगे घेऊन रामदरस उभा होता.शाळेतील लहान मुलांनी पालकांकडे हट्ट करत या फुग्यांसाठी तेथे गर्दी सुरू केली. काही मुले-पालक फुगे घेऊन निघाले. त्याच वेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, फुगेवाला काही फूट उंच उडाला आणि शाळेच्या पत्र्यांना आपटून खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या वेळी फुगेवाल्याच्या भोवती असलेली, तेथून जाणारी मुले, पालक या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले. गॅसमुळे त्यांचे डोळे, चेहरा, हाताला जखमा झाल्या. ते भाजले. या प्रकारानंतर शाळेत एकच घबराट पसरली. शिक्षक, पालकांचा आरडाओरडा, मुलांची रडारड यामुळे नेमके काय झाले आहे, तेच समजण्यास मार्ग नव्हता, अशी माहिती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या पालकांनी ‘लोकमत’ला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता कोळसेवाडी पोलीस आणि ठाण्याचे बॉम्बशोधक-नाशक पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. फुगेवाला कसा आला, माहीत नाही गेल्या १० वर्षांपासून आम्ही हा कार्यक्र म करतोय. त्यात मुले आणि पालक सहभाग घेतात. पण, फुगेवाल्याला आम्ही आतमध्ये बोलावले नव्हते. तो कसा आत आला, हे समजले नाही. हा प्रकार घडल्याने आम्ही खूप दु:खी झालो आहोत. ही सर्व माझी मुले आहेत. शाळा प्रशासन त्यांच्या उपचाराची जबाबदारी घेईल. - भारत जोगिंदरनाथ मलिक, संचालक, आर्य गुरुकुल शाळा लहान मुलांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, पालकांसोबत आलेल्या प्रियंका मोरे यांच्या डाव्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी, डोळ्यांवरील उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रशांत चौधरी यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्यांनाही जे.जे. रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. - डॉ. स्मिता रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, केडीएमसी
शाळेच्याच फुगेवाल्याने धंदा मांडला...
By admin | Published: December 25, 2015 2:43 AM