Join us

दप्तराच्या ओझ्यामुळे 32.9 टक्के विद्यार्थ्यांनींना पाठदुखीचा होतो त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:38 PM

95.8 टक्के विद्यार्थी रोज बघतात टीव्ही, तर फक्त 41 टक्के मुली खेळतात मैदानी खेळ. केईएम हॉस्पिटलच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ.स्वाती परांजपे यांच्या शोधनिबंधात हे धक्कादायक वास्तव्य उघड

मनोहर कुंभेजकरमुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू असून ओझे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे किती आहे आणि त्याचा  विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याची नुकतीच शास्त्रीय निकषांवर पाहणी केली असता शोधनिबंधात धक्कादायक माहिती समोर आली.

मुंबई उपनगरातील तीन वेगवेगळ्या शाळांतील इयत्ता आठवी व नववीत शिकणाऱ्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील ५५५ विद्यार्थ्यांचे नुकतेच सर्वेक्षण केले. आणि शास्त्रीय निकषांवर त्याचे निष्कर्ष तपासून पहिले असता तब्बल ३२.९ टक्के  विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास जाणवल्याचे एका पाहणीत आढळून आलं आहे.

केईएम हॉस्पिटलच्या फिझिओथेरपी या विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. स्वाती परांजपे आणि त्यांच्या सहकारी डॉ. वैशाली इंगोले  यांनी 'शालेय विद्यार्थ्यांमध्ये दप्तराच्या ओझ्यामुळे आढळणाऱ्या पाठदुखीबाबतच्या शोधनिबंधात' तब्बल ३२.९ टक्के विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास जाणवल्याचं आढळून आलं. हे प्रमाण शास्त्रीय कसोटीवर लक्षणीय मानले जाते. 

ज्या मुलांना दप्तर जड वाटते, जी मुले दिवसातून एक तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघतात अशा मुलांमध्ये तसेच  मुलींमध्ये पाठदुखीचं हे प्रमाण जास्त असल्याचे आढळलं. जड दप्तर असणाऱ्या ४३.५ टक्के मुलांमध्ये, तर टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये ३०. ८ टक्के तर एकंदर ४२.६ टक्के मुलींमध्ये पाठदुखीचा त्रास असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले अशी माहिती डॉ. परांजपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या संशोधनातून सर्वेक्षण केलेल्या पाहणीत मुलांपैकी जवळजवळ ९५. ८%  मुले  रोज टीव्ही पाहताना आढळून आली तर मैदानी खेळ खेळणा-या मुलांची टक्केवारी  केवळ ४१%  होती, हे चित्र मुलांच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असून पालकांनीही याबाबत जागरूक होऊन आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले. 

हा शोधनिबंध 'CUREUS' ह्या अमेरिकन वैद्यकीय जर्नलमध्ये १४ जुलै २०१८ रोजी  प्रसिद्ध झाला आहे. उपलब्ध संशोधनाचा विचार करता मुंबई उपनगरातील विद्यार्थ्यांवर झालेले अशाप्रकारचे पहिलेच शास्त्रीय संशोधन असून त्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले पाठदुखीचे मोठे प्रमाण दिसून आले आहे व ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आपल्या शोधनिबंधात परांजपे यांनी नमूद केले आहे.दप्तराचे ओझे, तसेच एक तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यामुळे शरीरावर  होणारे वाईट परिणाम. विशेषत्वाने मुलींमध्ये आढळलेल्या वाढत्या पाठदुखीचे प्रमाण चिंताजनक आहे. या संशोधनाने दप्तर ओझे कमी करण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांना शास्त्रीय बळकटी मिळते आहेच. परंतू त्याच बरोबर वयात येणाऱ्या मुलींकडे विशेष लक्ष पुरवणे तसेच मुलांना टीव्ही सारख्या मनोरंजनापेक्षा मैदानी खेळाकडे प्रवृत्त करण्याची गरजही शोधनिबंधात अधोरेखित केली आहे. 

महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना हा शोधनिबंध प्रत्यक्ष भेटून डॉ.स्वाती परांजपे यांनी नुकताच सादर केला. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या दृष्टीने  सरकारी पातळीवर संबंधित प्रतिनिधींची तातडीची बैठक लवकरच आयोजित करुन या समस्येचे प्रमाण भावी पिढीत वाढू नये म्हणून शिक्षणमंत्री या नात्याने स्वतः  विशेष लक्ष पुरवणार असल्याचे आश्वासन राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी डॉ. परांजपे यांना दिले, अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.