मुंबई : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बिलात सर्व्हिस चार्ज आकारण्यात आला. पण, अन्नपदार्थ आणि सेवा तितकीशी चांगली नसल्याने ग्राहकाने ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाने हॉटेलला सर्व्हिस चार्ज आकारल्यामुळे ५ हजार आणि नुकसानभरपाई म्हणून ५ हजार असा १० हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेले १० हजार रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार असल्याचे ग्राहकाने स्पष्ट केले.आयपीएस जयजीत सिंह हे आॅगस्टमध्ये लोअर परेल येथील पंजाब ग्रिल रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. बिलात १० टक्के सर्व्हिस चार्ज आकारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पण, तिथले अन्नपदार्थ आणि सेवा तितकीशी चांगली नव्हती. त्यांनी ही बाब हॉटेल मॅनेजरच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांना सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक करण्यात आले.यानंतर सिंह यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. बिलामध्ये आकारलेला १८१.५ रुपयांचा सर्व्हिस चार्ज आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मंचाने हॉटेलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले, पण हॉटेलकडून कोणीही आले नाही. सिंह यांनी बिलाची कॉपीदेखील मंचासमोर सादर केली. हॉटेलने सर्व्हिस चार्जविषयी आधी माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला. ‘सर्व्हिस चार्ज किती आकारला याविरोधात नाही, तर हॉटेल चालकाचा अहंकार आणि उद्दामपणाविरोधात लढा आहे. अनेक ग्राहकांना मनाविरुद्ध चार्ज द्यावा लागतो. पण याविरोधात ते आवाज उठवत नाहीत. हे थांबायला हवे म्हणून मी तक्रार दाखल केली आहे’, असे सिंह यांनी सांगितले. तसेच मिळणारे दहा हजार रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवाकर आकारल्याने हॉटेलला दंड, ग्राहक मंचाचा निर्णय, दंडाची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:57 AM