Join us

धिमी लोकल जलद झाल्याने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:10 AM

कल्याण येथून सुटलेली धीमी लोकल मुलुंड स्थानकानंतर थेट घाटकोपरला थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

मुंबई : कल्याण येथून सुटलेली धीमी लोकल मुलुंड स्थानकानंतर थेट घाटकोपरला थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. बुधवारी सकाळी कल्याण येथून धीमी लोकल म्हणून चालवण्यात आलेली लोकल कोणत्याही उद्घोषणेशिवाय मुलुंड स्थानकानंतर अर्धजलद म्हणून चालवल्याने प्रवासी संतप्त झाले. या प्रकरणी मध्य रेल्वेतील जनसपंर्क अधिकारी विभागाने असा प्रकार घडला नसून, ती लोकल अर्धजलद असल्याचा दावा केला आहे.दिवा येथे राहणाऱ्या दिव्या मांडे यांनी सांगितले की, कल्याण स्थानकातून सुटलेली ९ वाजून ५१ मिनिटांची धीमी लोकल दिवा स्थानकातून पकडली. ती उशिराने धावत होती. मुलुंड स्थानकानंतर नाहूर स्थानकावर ती थांबणे अपेक्षित होते. सर्व महिला उतरण्यासाठी लोकलच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. मात्र, ही लोकल थेट घाटकोपर स्थानकात थांबल्याने मनस्ताप झाला. लोकलमधील प्रवाशांना कोणतीही माहिती दिली नव्हती.या प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ९ वाजून ५१ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी धीमी लोकल सुमारे १९ मिनिटे उशिराने धावत होती, यामुळे हीच लोकल अर्धजलद चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानुसार मुलुंड स्थानकानंतर ही लोकल अर्धजलद म्हणून चालवण्यात आली.मध्य रेल्वेवर सिग्नल ओलांडणे, चुकीच्या सिग्नलमुळे लोकल भरकटणे आणि फलाटावर न थांबता लोकल पुढे जाणे, असे प्रकार घडले आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बुधवारी असा प्रकार झालेला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी दिली.

टॅग्स :लोकल