मायानगरी मुंबापुरीच्या पर्यावरणाला झाली धूर, धूळ, धुक्याची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:10 AM2018-10-15T07:10:31+5:302018-10-15T07:11:11+5:30
शहर आणि उपनगरात दिवसागणिक धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे.
मुंबई : शहर आणि उपनगरात दिवसागणिक धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. अंधेरी, वरळीसह आता वांद्रे-कुर्ला संकुल या भागात हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. ‘सफर’ हे संकेतस्थळ हवेतील धूलिकणांचा (पार्टिक्युलेटर मॅटर) आढावा घेते. त्यांच्या शनिवारच्या अहवालानुसार, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल भागात धूलिकणांचे प्रमाण वाढले असून, हे प्रमाण खूप खराब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई धूलिकणांत हरवली आहे. अंधेरीत धूलिकणांचे प्रमाण ३१७ पीपीएम, वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये धूलिकणांचे प्रमाण ३३० पीपीएमवर पोहोचले आहे. नवी मुंबईत ३३१ पीपीएमवर धूलिकणांचे प्रमाण गेले आहे. या अहवालावरून हवेचा दर्जा घसरल्याचे निदर्शनास येते.
माझगाव, कुलाबा, बोरीवली, चेंबूर या भागांतील हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण गेल्या आठवड्यात ठीक होते. मात्र या भागात धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता घसरल्याचे अहवालातून निदर्शनास येते.
मुंबई शहरातील माझगाव २५५, कुलाबा २३५, वरळी १८६, पश्चिम उपनगरातील अंधेरी ३१७, वांद्रे-कुर्ला संकुल ३३०, बोरीवली २२५, मालाड ५८, पूर्व उपनगरातील चेंबूर २०७, भांडुप १८१ आणि नवी मुंबई ३३१ असे धूलिकणांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे.
धूर, धूळ, धुके यांच्या मिश्रणातून धूरके तयार होते. या धूरक्याची चादर मुंबईवर पसरली आहे.
धूरक्याच्या चादरीमुळे मुंबईकरांना खोकला, सर्दी, कफची समस्या जाणवत आहे. त्वचारोगाच्या समस्या जाणवत असून आरोग्य धोक्यात आले आहे.