भरधाव वेगामुळे दररोज २६७ जण गमावतात जीव, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:57 AM2019-11-28T06:57:57+5:302019-11-28T06:58:04+5:30

भरधाव वेगाने वाहन चालविणे हे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत असून, यामुळे देशात वर्षभरात ९७,५८८ जणांना नाहक जिवास मुकावे लागले आहे.

Due to speeding, 267 people lost their lives every day, reports the Central Road Transport Ministry | भरधाव वेगामुळे दररोज २६७ जण गमावतात जीव, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा अहवाल

भरधाव वेगामुळे दररोज २६७ जण गमावतात जीव, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा अहवाल

Next

मुंबई : भरधाव वेगाने वाहन चालविणे हे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत असून, यामुळे देशात वर्षभरात ९७,५८८ जणांना नाहक जिवास मुकावे लागले आहे. इतकेच नव्हे, तर याच भरधाव वेगामुळे दररोज २६७ जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

२०१७, तसेच २०१८ या दोन वर्षांची तुलना केल्यास २०१७ मध्ये भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे ३,२७,४४८ अपघात घडले होते. यात ९८,६१३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३,४३,०८३ जण जखमी झाले होते. २०१८ मध्ये भरधाव वेगामुळे झालेल्या ३,१०,६१६ अपघातांमध्ये ९७,५८८ जणांचा मृत्यू झाला असून, ३,१६,४२१ जण जखमी झाले. याचाच अर्थ वेगामुळे २०१८ मध्ये दररोज सरासरी २६७ जणांना नाहक जीव गमवावा लागला आहे.

भरधाव वेगासोबतच मोबाइलवर बोलणे, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, उलट दिशेने, बेशिस्तपणे वाहन चालविणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे अशी विविध कारणे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे.

२०१७ मध्ये भरधाव वेग वगळता अन्य कारणांमुळे घडलेल्या ७९,३९३ अपघातात २९,९९९ जणांचा मृत्यू झला असून, २०१८ मध्ये १,०६,१५३ अपघातांत ३५,६२५ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा सुधारणेकडे लक्ष द्यावे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दुचाकीने घेतले सर्वाधिक बळी
देशात २०१८ मध्ये देशात झालेल्या रस्ते अपघातांतील मृत्यूंपैकी ५५,३३६ मृत्यू हे दुचाकी अपघातात झाले आहेत, तर कार, टॅक्सी, व्हॅन आदी वाहनांमुळे झालेल्या अपघातांत २५,११५ जणांचा मृत्यू झाला. ट्रक आणि इतर अवजड वाहनांमुळे १५,१५०, इलेक्ट्रिक रिक्षासह इतर वाहनांच्या अपघातांमुळे ११,१०९, बसमुळे ८,१६४, रिक्षांमुळे ६,६२९, सायकलमुळे ३,६७३, तर इतर कारणांमुळे ३,५८५ जणांना जिवास मुकावे लागले.

मोबाइल ठरतो जीवघेणा
मोबाइलवर बोलत वाहन चालविणे हेदेखील रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहे. वाहन चालविताना मोबाइलचा वापर केल्याने २०१७ मध्ये ८,५२६ अपघात घडले. यात ३,१७२ जणांचा मृत्यू झाला, तर २०१८ मध्ये याच कारणामुळे घडलेल्या ९,०३९ अपघातांमध्ये ३,७०७ जणांनी जीव गमावला.
याचाच अर्थ, २०१७ व २०१८ या वर्षांची तुलना केल्यास वाहन चालविताना मोबाइलचा वापर वाढत असून, त्यामुळे अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

हेल्मेट न वापरणे मृत्यूस कारणीभूत
रस्ते अपघातात १,३०,१४४ पुरुषांचा तर २१,२७३ महिलांचा मृत्यू झाला. हिट अँड रनच्या ६९,८२२ घटनांमध्ये २८,६१९ जणांचा
मृत्यू झाला असून, ६१,९८८ जण जखमी झाले, तर हेल्मेट नसल्यामुळे ४३,६१४ तर सीट बेल्टचा वापर न केल्यामुळे २४,४३५ जणांनी जीव गमावला.

Web Title: Due to speeding, 267 people lost their lives every day, reports the Central Road Transport Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात