खाजगी बसच्या थांब्यामुळे दादर, सायन, चेंबूर परिसरामध्ये होत आहे वाहतूककोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:54 AM2019-07-23T01:54:01+5:302019-07-23T01:54:30+5:30
मुंबईमध्ये दादर टी. टी., सायन तलाव व चेंबूर डायमंड गार्डन या तीन ठिकाणांवर खाजगी बसचालक प्रवासी भरण्यासाठी बस बराच वेळ थांबवतात.
मुंबई : दादर, सायन व चेंबूर येथे मुख्य महामार्गावर अनेक खाजगी बस प्रवासी भरण्यासाठी उभ्या असतात. संध्याकाळी सहानंतर या खाजगी बसचे प्रमाण वाढते. आधीच मुंबईत संध्याकाळी मोठी वाहतूककोंडी होत असते. त्यात या खाजगी बस प्रवाशांची वाट बघत मुख्य रस्त्यालगत उभ्या असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.
मुंबईमध्ये दादर टी. टी., सायन तलाव व चेंबूर डायमंड गार्डन या तीन ठिकाणांवर खाजगी बसचालक प्रवासी भरण्यासाठी बस बराच वेळ थांबवतात. आधीच या भागांमधील रस्ते निमुळते आहेत. त्यात अर्धा रस्ता या बसने व्यापल्यामुळे वाहतूककोंडी होते. महाराष्ट्रात व देशभरात विविध ठिकाणी जाण्यासाठी मुंबईतून दररोज हजारो खाजगी ट्रॅव्हल्स बस सुटतात. दिवसभर या बस मुंबईतून प्रवासी घेऊन जात असतात. परंतु संध्याकाळी सहानंतर या बसचे प्रमाण वाढते. या खाजगी बसला कोणताही अधिकृत थांबा नसल्याने हे बस चालक दादर, सायन व चेंबूर या मोक्याच्या ठिकाणांवर दररोज बस उभ्या करतात. वाहतूक पोलीसदेखील बस चालकांच्या या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत. चेंबूरमध्ये सायन-पनवेल महामार्ग या मुख्य रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे रस्ता निमुळता झाला आहे. यातच खाजगी बस रस्त्यावर उभ्या राहिल्यामुळे वाहतूक अजून मंदावते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर तोडगा काढून खाजगी बससाठी मुंबईत एक वेगळी जागा ठरवून द्यावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.