भीमसैनिकांच्या वादळापुढे ओखी निष्प्रभ, ६१ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:39 AM2017-12-06T00:39:00+5:302017-12-06T00:39:22+5:30
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशासह राज्यभरातून दाखल...
मुंबई : महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशासह राज्यभरातून दाखल झालेल्या भीमसैनिकांना मंगळवारी ‘ओखी’ वादळासह पावसाचा फटका बसला. मात्र, अशा परिस्थितीतही भीमसैनिकांनी सतर्कता आणि संयम बाळगत महामानवाला अभिवादन करण्याचा निर्धार कायम ठेवला होता. दरम्यान, हवामान खात्याने जर पावसाचा इशारा दिला होता, तर महापालिकेने अगोदरच अनुयायांची पर्यायी व्यवस्था का केली नाही? असा सवालही भीमसैनिकांनी उपस्थित केला. पालिकेकडून आतापर्यंत महापालिकेच्या ७० शाळांमध्ये अनुयायांसाठी तात्पुरत्या निवासाची सर्व सुखसोयींसह व्यवस्था करण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्थानकावर उतरणाºया अनुयायींना शिवाजी पार्क मंडपात न घेऊन जाता, त्यांना विनाशुल्क बेस्ट बसेसद्वारे आसपासच्या परिसरात उपलब्ध असणाºया शाळांमध्ये नेण्यात येत आहे. ‘ओखी’ चक्रिवादळ व समुद्रातील पाच मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल यांची पथके चैत्यभूमी परिसरात तैनात ठेवण्यात आली आहेत, तर भारतीय तटरक्षक दलास सतर्क ठेवण्यात आले आहे. महापालिकेचे २४ विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले आहते.
९ आरोग्य कक्ष : चैत्यभूमी परिसरात कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये, याकरिता उपायुक्त व त्यांच्या साहाय्याकरिता तीन सहायक आयुक्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परिसरात ९ तात्पुरते आरोग्य कक्ष उभारण्यात आले असून, अधिक मदतीकरिता महापालिकेच्या व १०८ आणीबाणी वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या निवाºयाच्या ठिकाणी आरोग्यसेवेसाठी वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत.
मोफत बससेवा
दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीकडे जाण्याकरिता बीईएसटीमार्फत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे पैसे महापालिकेमार्फत बीईएसटीला अदा करण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरात येणाºया अनुयायींकरिता जेवणाची व पाण्याची व्यवस्था, तात्पुरत्या निवाºयांच्या ठिकाणी संबंधित सहायक आयुक्त व अशासकीय संस्थांमार्फत करण्यात आली आहे.
हॉल्स व सभागृहे उघडी
पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात चिखल झाला आहे. अनुयायींकरिता राहण्याच्या व्यवस्थेसोबत चैत्यभूमी परिसरात असणारे हॉल्स व सभागृहे उघडे ठेवण्यात आले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नये
कोणतेही रस्ते, पूल, सी-लिंक बंद ठेवण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर व उपनगरातील रेल्वेसेवा, वाहतूकसेवा सुरळीत सुरू आहेत. नागरिकांनी/पर्यटकांनी कृपया समुद्रकिनारी आत जाणे टाळावे, तसेच अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.