Join us

खलाशांच्या जिद्दीमुळे तीन दिवसांनंतर बाेट सुखरूप परतली किनारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खवळलेला समुद्र, जोरदार लाटा, वेगाने वाहणारे वारे, तुटलेले स्टेरिंग आणि नांगर, अशा कठीण परिस्थितीतही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खवळलेला समुद्र, जोरदार लाटा, वेगाने वाहणारे वारे, तुटलेले स्टेरिंग आणि नांगर, अशा कठीण परिस्थितीतही उत्तन येथील पाली बंदरातील न्यू मेरीहेल्प बोट अरबी समुद्रात उठलेल्या तौक्ते चक्रीवादळातून तीन दिवसांनंतर सहा खलाशांसह मंगळवारी सुखरूप किनाऱ्याला लागली, ती केवळ खलाशांमधील जिद्दीच्या जोरावर.

पाली बंदरातून शुक्रवारी १४ मे रोजी समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक बोट किनारी परतली नसल्याचे लक्षात आले. बोटीचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. काही वेळानंतर ही बोट ४० सागरी मैल अंतरावर असल्याचे लक्षात आले. जेव्हा ती १८ सागरी मैलांवर आली तेव्हा बाेटीचा काहीसा संपर्क झाला आणि त्यांनी रविवारी संध्याकाळी स्थानिक जस्टीन मिरांडा यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, सोमवारी चक्रीवादळाचा आणि पावसाचा जोर आणखी वाढला. मात्र तब्बल तीन दिवस अथक प्रयत्नांती आणि जिद्दीच्या जोरावर ही बोट मंगळवारी किनारी लागली आणि सहा खलाशांचे प्राण वाचले.

दरम्यान, मासेमारीसाठी निघताना बोटीत दहा दिवसांचे अन्न, पाणी आणि डिझेल असल्याने अडचण नव्हती. मात्र चक्रीवादळाने सारेच भयभयीत झाले होते. स्थानिक मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी यावेळी आहे त्या स्थितीत बोट किनारी आणण्याचा सल्ला दिला. उत्तन येथील पाली बंदरातील या न्यू मेरीहेल्प बोटीतील पाच खलाशांचा जीव त्यांच्यातील जिद्दीमुळेच वाचला.