बिरवाडी : महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून बिरवाडी बाजारपेठ मोहल्ल्यामध्ये गेल्या ८ ते १० दिवसांत ७ ते ८ जणांना कावीळची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाधित रुग्ण हे महाड, बिरवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत काळ नदीवरील जॅकवेलद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मुळातच बिरवाडीमधील गटाराचे सांडपाणी काळ नदीपात्रात मिसळल्याने काळ नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्या दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव बिरवाडीमध्ये झपाट्याने वाढत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना कावीळची लागण झाली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता दर महिन्याला किमान ३ ते ४ जण कावीळ रोगाची बाधा झालेले रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता येत असतात. मात्र कावीळच्या साथीची लागण झाल्याची कोणतीही माहिती आपल्याला प्राप्त झाली नाही. कावीळची लागण झाली असल्यास त्वरित सर्वे करून त्यावर योग्य ती उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे जोगदंड यांनी सांगितले. बिरवाडीमध्ये वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेने सांडपाण्याचा निचरा किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अस्तित्वात नसल्याने हे पाणी थेट नदी पात्रात जात असून विहिरीही प्रदूषित झाल्या आहेत.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे बिरवाडीत कावीळची साथ
By admin | Published: April 02, 2015 10:40 PM