Join us  

स्वाइनमुळे नाशिकच्या एकाचा मुंबईत मृत्यू

By admin | Published: February 19, 2015 2:18 AM

स्वाइनच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या नाशिकच्या ५८ वर्षीय पुरुषाचा सोमवार, १६ फेब्रुवारीला रात्री मृत्यू झाला. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या मृतांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे.

मुंबई : स्वाइनच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या नाशिकच्या ५८ वर्षीय पुरुषाचा सोमवार, १६ फेब्रुवारीला रात्री मृत्यू झाला. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या मृतांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाइन फ्लूचे १९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ नवे रुग्ण मुंबईत उपचारासाठी आले आहेत. दीड महिन्यात मुंबईत स्वाइनचे १६३ रुग्ण आढळून आले आहेत.नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुषास उच्च रक्तदाब, मधुमेह, हीपॅटायटिस सी असे आजार होते. ८ फेब्रुवारी रोजी या व्यक्तीला स्वाइनची लक्षणे दिसून आली होती. १२ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. १३ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापालिका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. १६ फेब्रुवारीला रात्री ९ वाजून २० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या १९ नव्या रुग्णांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून सहा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईबाहेरून ८ नवे रुग्ण मुंबईत उपचारासाठी दाखल झाले असून, यामध्ये एका दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. मुलीला धरून चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवार, १८ फेब्रुवारीपर्यंत मुंबईबाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूचा ताप आल्यामुळे आतापर्यंतचे मृत्यू झालेले नसून, पुढे वाढणाऱ्या गुंतागुतीमुळे रुग्णांचा मृत्यू होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्वाइन फ्लू हा आजार इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो. इन्फ्लुएन्झाचा व्हायरस हा मानवी शरीरात नाकावाटे प्रवेश करतो. या व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यावर आधी फ्लूची लक्षणे दिसून येतात.वातावरणातील बदलांमुळे सामान्यत: सर्दी, खोकला, घशाला संसर्ग असे त्रास जाणवतात. पण बदलांमुळे होणारा त्रास २-३ दिवसांत बरे होतात. जर हे प्राथमिक आजार बरे झाले नाहीत तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़ स्वाइनची लक्षणे ही फ्लूप्रमाणेच आहेत. थंडी त्यासाठी पोषक ठरते. त्यामुळेच सर्वांनीच काळजी घ्यावी, असे महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. च्न्यूमोनियासारखा आजार उद्भवल्याने प्रकृती नाजूक होते़ त्यातील गुंतागुंतीमुळे मृत्यूचा धोका वाढतो, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी सांगितले.