टॅबच्या प्रतीक्षेमुळे दप्तराचे ओझे कायम, पुरवठ्यासाठी मिळेना ठेकेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:38 AM2017-12-24T01:38:55+5:302017-12-24T01:39:10+5:30
शालेय पोषण आहार, शैक्षणिक साहित्यांचे वाटप या योजनांप्रमाणेच विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या पालिकेच्या योजनेचेही बारा वाजले आहेत. मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली.
मुंबई : शालेय पोषण आहार, शैक्षणिक साहित्यांचे वाटप या योजनांप्रमाणेच विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या पालिकेच्या योजनेचेही बारा वाजले आहेत. मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या वेळेस महापालिकेने तीन वेळा निविदा काढूनही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटले, तरी पालिका शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना अद्याप टॅब मिळालेला नाही.
पालिकेचे शिक्षण हायटेक करण्यासाठी व्हर्चुअल क्लासरूमनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टॅबची संकल्पना आणली. त्यानुसार, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. टॅबवरून अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाबाबत गोडी वाढेल व त्यांच्या पाठीवरील ओझेही कमी होईल, असा या मागचा विचार होता. मात्र, टॅबच्या प्रतीक्षेमुळे दप्तराचे ओझे कायम आहे.
नववीचा अभ्यासक्रम बदलल्याने त्यांचे टॅब आठवीच्या विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे नववीच्या विद्यार्थ्यांना नवीन टॅब देण्यासाठी निविदा प्रक्रिया पालिकेने सुरू केली. मात्र, आतापर्यंत तीनदा निविदा काढूनही टॅब पुरवठा करणाºया कंपन्या पुढे आल्या नाहीत. त्यामुळे योजनेचे उद्दिष्टच धोक्यात आले आहे. निविदा मागविण्याचे तीन प्रयत्न फसल्याने शिक्षण विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.
१३ हजार टॅब खरेदी करावे लागणार
नववीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलल्याने, १३ हजार टॅब महापालिकेला खरेदी करावे लागणार आहेत. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने, तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. नव्या वर्षात जानेवारी महिन्यातच विद्यार्थांना टॅब मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले.