भातसामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 03:10 PM2019-06-13T15:10:26+5:302019-06-13T15:12:50+5:30
मुंबईसह ठाण्याला पाणी पुरवठा होणाºया भातसा धरणाच्या ठिकाणी तांत्रिक बिघाडाचा फटका ठाण्याला सर्वाधिक बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणी पुरवठा बुधवार पासून बंद झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा घोडबंदर भागाला बसला असून त्या खालोखाल कोपरी, टेकडी बंगला, अंबिका नगर आदी भागांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. परंतु आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. असे असले तरी पुढील १४ जून पर्यंत शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. एकीकडे ठाण्याला ६० टक्के फटका बसला असतांना दुसरीकडे मुंबईला मात्र याचा २५ टक्के फटका बसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे मुंबईतही पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणारे २८ आणि ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारे ४ ही पंप बंद पडले होते. अखेर १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून पाणी उचलण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु भातसापासून पिसे पर्यंत पाणी उचलण्यात येत असल्याने याठिकाणी १६ किमीचे अंतर आहे. त्यामुळे या १६ किमीच्या कॅनलमध्ये खडखडाट झाला होता. त्यानंतर जेव्हा पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तेव्हा या कॅनलमधून पाणी पिसे पर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होऊन त्याचा फटका ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाल्याचे दिसून आले. या कॅनलमध्ये पाणी सुरवातीला न आल्याने ते कॅनल सुखले होते. त्यात त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ होता. त्यामुळे पाणी येथून पुढे जाईपर्यंत अडथळे निर्माण झाले होते.
या अडथळ्यांमुळे मुंबईने पाणी उचलण्यासाठी आपला प्रेशर ६५ वरुन ३५ वर आणला होता. तर ठाणे महापालिकेला मात्र शुन्य प्रेशर मिळाला. तर मुंबईचे २८ पैकी सुरवातीला १५ पंप सुरु होते. तर ठाणे महापालिकेचा केवळ १ पंप सुरु होता. त्यामुळे मुंबई शहराला याचा २५ टक्के बसला असून ठाण्याला मात्र ६० टक्के फटका बसल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिका बीएमसीकडून ६० एमएलडी पाणी पुरवठा उचलत असल्याने त्याचाही फटका ठाण्यालाच अधिक बसल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्वाचा परिणाम ठाण्यातील अनेक भागांना पाण्याचा खडखडाट झाला होता. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून बुधवारी सांयकाळ पासून या भागाला पाणी पुरवठा बंद झाला आहे. तर शहरातील कोपरी, अंबिका नगर, टेकडी बंगला याशिवाय उंचावरील भागांनासुध्दा याचा अधिक फटका बसला आहे.
टँकरची संख्या वाढली दुप्पटीने
ज्या ज्या भागांना पाणी नाही, त्या भागात पालिकेच्या माध्यमातून २५ टँकरेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतु रोज होणाऱ्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.
मुंबईला २५ टक्के तर ठाण्याला ६० टक्के कपात
या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला २५ टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागला असून ठाण्याला मात्र तब्बल ६० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागला आहे. असे असले मुंबई आणि ठाण्याला पुढील १४ जून पर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.