मुंबई - मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ही सेवा सुरू होईल असे एमएमआरडीएच्यावतीने सांगण्यात आले आहे.
वडाळा ते चेंबूर या पहिल्या आणि वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या टप्प्यावर मोनो धावते. मात्र शनिवारी (3 ऑगस्ट) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तांत्रिक कारणास्तव मोनोरेलची सेवा बंद पडली आहे. अजूनही ही सेवा बंद आहे. मोनोरेल बंद झाल्याने मार्गावरील मोनो वडाळा येथील डेपोमध्ये नेण्यात आल्या. अचानक मोनो बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. लवकरच ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले. याआधी देखील अनेकदा मोनोरेलमध्ये तांत्रित बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. तसेच पावसामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला रेल्वे स्थानक तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वडाळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (3 ऑगस्ट) हार्बर मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. तसेच कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे ठाणे, डोंबिवली यासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ठाणे, मुलुंड रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. तर अंबरनाथ, कल्याणमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.
मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.
मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवाही संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.