थर्माकोलबंदीमुळे गणपती बाप्पा विराजमान होणार कापडी मखरांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:32 AM2018-07-22T04:32:28+5:302018-07-22T04:33:00+5:30
र्माकॉलबंदी असल्याने ग्राहकांनी कापडी मखराचा पर्याय स्विकारण्यास सुरवात केली आहे.
- अजय परचुरे
मुंबई : थर्माकोलवरील बंदी उच्च न्यायलयाने कायम ठेवल्याने यंदा गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईच्या बाजारात कापडी मखरांचा पर्याय पुढे आला आहे. गणेशोत्सवाला मोजून काही दिवस उरले असल्याने मुंबईच्या घाऊक बाजारात सध्या छोटे-मोठे कापडी मखर दिसू लागले आहेत. थर्माकॉलबंदी असल्याने ग्राहकांनी या कापडी मखराचा पर्याय स्विकारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या बाजारात या मखरांना सध्या वाढती मागणी आहे.
बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडप आणि मकर सजावट केली जाते. या काळात दादर परिसरात मोठ्या प्रमाणात सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येते. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्याने, सध्या दादरच्या बाजारपेठांमध्ये बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य येथे दाखल झाले आहे. यात कापडी मखर हे ग्राहकांसाठीचे प्रमुख आकर्षण आहे. अनेक मुंबईकर कोकणात आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जातात. त्या वेळी जाताना मुंबईतून मखर घेऊन जाण्याचा अनेक वर्षांचा शिरस्ता आहे. मात्र, यंदा त्यांना थर्माकोलऐवजी कापडी मकर गावी न्यावे लागणार आहेत.
दीड हजारांपासून सुरुवात
सध्या दादरच्या बाजारात दीड फुटांपासून ते सहा फुटांपर्यंतच्या कापडी मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे कापडी मखर कागदी पुठ्ठ्यांचे छोटे-छोटे रॉड करून तयार केले जातात. सध्या या कापडी मखराची किंमत बाजारात दीड हजारांपासून ते आठ हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने या कापडी मखरांची मागणी वाढली आहे.
उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवल्याने आता थर्माकोलचे मखर बाजारात उपलब्ध नाहीत. आम्ही दरवर्षी आमच्या गावी कोकणात जाताना गणपतीसाठी मुंबईतून मखर घेऊन जातो. थर्माकोलचे मखर नेताना खूप सांभाळावे लागे. मात्र, कापडी मखर गुंडाळूनही घेऊन जाऊ शकतो. - स्वप्ना नाईक, गृहिणी.
आमच्या दुकानात कापडी मखराला सध्या जास्त मागणी आहे. शनिवार-रविवारी मखर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. यंदा गणेशोत्सवापर्यंत कापडी मखरांची विक्रमी विक्री होईल, असा अंदाज आहे.
- सचिन टोळे, दुकानदार.