Join us

११ हजार बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले; कृती दल आजपासून लक्ष ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:12 PM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टोलेजंग टॉवर उभे राहत असून इमारतींच्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे.

मुंबई : मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असतानाच या प्रदूषणाला शहरातील धूळही कारणीभूत आहे. शहरात ११ हजार २१५ बांधकामे सुरू असून या बांधकामांमुळे प्रदूषणात भरच पडत आहे. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेचे उपाय युद्धपातळीवर  सुरू असून ही धूळ नियंत्रणात आणण्यासाठी कृती दल नेमण्यात आले आहे. हे कृती दल १ एप्रिलपासून बांधकामाच्या ठिकाणी जाऊन नियमावली नुसार काम होते की नाही हे तपासणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास काम रोखणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत टोलेजंग टॉवर उभे राहत असून इमारतींच्या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्य प्रचंड वाढले आहे. या बांधकामांमध्ये इतरही विकास कामांचा समावेश आहे. बोरीवली गोराई ९४२, अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरीत ९३३ बांधकामे, अंधेरी पश्चिमेस ८१५, डोंगरीत ८३, फोर्ट परिसरात १०१ व मुंबईतील इतर परिसरात हजारोंच्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. या बांधकामामुळे मुंबईच्या हवेवर परिणाम होत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृती दल काम करणार आहे.

प्रत्येक वॉर्डात तीन कृतीदल पाठवण्यात येणार असून प्रदूषण रोखण्याची जबाबदारी या कृती दलाची राहणार आहे. सहायक अभियंता, उपअभियंता, वैद्यकीय अधिकारी यांचा या कृती दलात समावेश आहे. सहायक आयुक्तांकडून कृती दलाच्या कामांचा आढावा घेतल्यावर त्याचा अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे प्रत्येक महिन्याच्या ५ व २० तारखेला हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईप्रदूषण