बेस्टच्या संपावरून श्रेयवादाची लढाई रंगली, संप मिटल्याचे सरकारकडून काेणी सांगत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:18 AM2023-08-09T07:18:53+5:302023-08-09T07:19:58+5:30

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील; बेस्ट, पालिकेचे अधिकारी नाॅटरिचेबल

Due to BEST's strike, the war of credulity raged, no one from the government is saying that the strike is over | बेस्टच्या संपावरून श्रेयवादाची लढाई रंगली, संप मिटल्याचे सरकारकडून काेणी सांगत नाही 

बेस्टच्या संपावरून श्रेयवादाची लढाई रंगली, संप मिटल्याचे सरकारकडून काेणी सांगत नाही 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सात दिवसापासून सुरू असलेल्या बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी त्यावरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय वादाची लढाई समोर आली आहे. त्यामुळे संप मिटला की नाही हे ठामपणे सरकारच्या वतीने कोणी सांगायला तयार नाही. संपकरीच म्हणतात, आमच्या मागण्या मान्य झाल्या आणि संप मिटला..! मात्र बेस्टचे किंवा महापालिकेचे अधिकारी समोर येऊन याबद्दल काहीही सांगायला तयार नव्हते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा बैठक घेऊन संप मिटवला असे या आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या रघुनाथ खजूरकर व त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी संपकऱ्यांना येऊन सांगितले. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचे कोणतेही पत्र प्रसिद्ध देण्यात आले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली असून, त्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जाहीर केले. मात्र, लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम पवित्रा इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

या आंदोलनात डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्वीच मोबॅलिटी या कंपनीच्या कंत्राटी चालकांनी सहभाग घेतला. या आंदोलनाची सुरुवात प्रज्ञा खजूरकर व त्यांचे पती रघुनाथ खजूरकर यांनी केली. त्यानंतर या आंदोलनात इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

आज बेस्टच्या सगळ्या गाड्या धावणार का?
आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर आझाद मैदानात जमलेले संपकरी सायंकाळी आपल्या घरी गेले. काही जण ड्युटीवर गेले; मात्र कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने आज मुंबईत बेस्टच्या सगळ्या गाड्या धावणार की नाही या पेचात मुंबईकर पडले आहेत.

भाजप - शिंदे गटात श्रेयवादाची लढाई?
n बेस्ट कर्मचारी येत्या २४ ते ४८ तासात संप मागे घेतील, असे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.
n त्यांच्या बोलण्याला दहा तासही उलटत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकऱ्यांना वर्षावर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. 
n नंतर संपकऱ्यांनी परस्परच संप संपल्याचे जाहीर केले. यावरून भाजप आणि शिंदे गटात संप मिटवण्याच्या श्रेयाची लढाई तर सुरू नव्हती ना, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांचे मोबाइल बंद
आंदोलन मागे घेतले की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी प्रज्ञा खजूरकर तसेच समन्वयक विकास खरमाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद होते.


आम्हाला प्रशासनाकडून लेखी आश्वासन हवे असून, आंदोलनकर्त्या प्रज्ञाताई यांनी व रघुनाथ खजूरकर (बुवा) यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली. त्यांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यामुळे आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
- योगेश घोलप, 
डागा ग्रुप, गोराई आगार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आंदोलनकर्त्यांसोबत रात्री बैठक झाली, त्या बैठकीत काय चर्चा झाली. काेणत्या मागण्या मान्य झाल्या, याबाबत काहीच माहिती नाही. मी संपकऱ्यांचा समन्वयक हाेताे पण मलाच चर्चेला बाेलावले नाही. त्यामुळे मी काय सांगणार?
- सुनील गणाचार्य, 
बेस्ट समिती माजी सदस्य, भाजप
संप मिटला, आम्हाला माहीतच नाही
मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर काही कंत्राटी कर्मचारी संप मिटला, असे एकमेकांना सांगत होते. तर काही कर्मचारी आम्हाला काहीच माहीत नाही, असे सांगत होते.

Web Title: Due to BEST's strike, the war of credulity raged, no one from the government is saying that the strike is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट